चंद्राच्या पृष्ठभागावर चीनच्या लँडरला मिळाले पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे; माती-दगडांचे केले परीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:49 AM2022-01-10T07:49:52+5:302022-01-10T07:50:13+5:30
खगोलशास्त्रातील महत्त्वाचे संशोधन, माती-दगडांचे केले परीक्षण
बीजिंग : चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा पहिलावहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग ५ या लँंडरला मिळाला आहे. त्यामुळे चंद्रासंदर्भातील संशोधनाला कलाटणी मिळणार आहे.
यासंदर्भात एका नियतकालिकात लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, चँग ५ हे लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्या पृष्ठभागावरील मातीत १२० पार्ट्स पर मिलियन (पीपीपीएम) किंवा दर टनामागे १२० ग्रॅम पाणी असल्याचे आढळून आले आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असणार असा तर्क याआधी काही देशांच्या संशोधकांनी विविध खगोलशास्त्रीय प्रयोगांतून काढला होता. मात्र, चीनच्या चँग ५ या लँडरने त्याबाबतचे पुरावेच शोधून काढले आहेत.
चँग ५ या लँडरमध्ये बसविलेल्या उपकरणांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील माती, दगड यांचे बारकाईने परीक्षण करून त्यांच्यातील पाण्याचा अंश शोधून काढला. चायना अकॅडमी ऑफ सायन्सेस (सीएएस)च्या संशोधकांनी आखलेल्या चांद्रमोहिमेला मिळालेले हे मोठे यश आहे. (वृत्तसंस्था)
अशी झाली पाण्याची निर्मिती
सौर वाऱ्यांमुळे चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीत आर्द्रता तसेच हायड्रोजन वायूची निर्मिती झाली. त्यातून तिथे पाणी तयार झाले. मात्र, त्यानंतरच्या काळात पर्यावरणीय बदलांमुळे चंद्राचा पृष्ठभाग संपूर्ण कोरडा झाला होता असेही चँग ५ या लँडरला आढळून आले.