चीनमधील नेत्यांना विविधता समजत नाही, दलाई लामा यांचा ड्रॅगनवर निशाणा; जिनपिंग यांच्या बाबतीत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 09:20 PM2021-11-10T21:20:39+5:302021-11-10T21:21:30+5:30
टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला.
टोकियो - चिनी नेत्यांना वेगवेगळ्या संस्कृतींची विविधता समजत नाही आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा कडक सामाजिक नियंत्रणाकडे असलेला कल, हा हानीकारक ठरू शकतो, असे तिबेटमधील निर्वासित अध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर अधिकृतपणे नास्तिक कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या चीन आणि बौद्ध धर्मीय तैवान यांच्या गुंतागुंतीच्या राजकारणात गुंतण्याऐवजी ते 1959 पासून राहत असलेल्या भारतातच राहू इच्छितात, असेही दलाई लामा यांनी म्हटले आहे.
टोकियो फॉरेन करस्पॉन्डंट्स क्लबने आयोजित केलेल्या ऑनलाइन न्यूज कॉन्फरन्समध्ये 86 वर्षीय दलाई लामा म्हणाले, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना भेटण्याची आपली कोणतीही खास योजना नाही. याच बरोबर, तिसर्यांदा पदावर राहण्याच्या शी यांच्या योजनेवर भाष्य करण्यासही त्यांनी नकार दिला.
दलाई लामा म्हणाले, ‘‘चीनी कम्युनिस्ट नेत्यांना सांस्कृतिक विविधता समजत नाही. खरे तर, अधिक नियंत्रणामुळे लोकांचे नुकसान होईल.’’ खरे तर चीन सर्वच धर्मांवर कठोर नियंत्रण ठेवतो आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी तिबेटियन, मुस्लीम उयगुर आणि इतर अल्पसंख्यक समुदायाला निशाना बनवून सांस्कृतिक समावेश करण्याच्या दृष्टीने अभियान चलवले आहे.
दलाई लामा 2011 मध्येच राजकारणातून निवृत्त झाले आहेत. मात्र, तिबेटीयन परंपरेच्या संरक्षणाचे ते प्रबळ समर्थक आहेत. चीनने त्यांच्यावर तिबेटच्या स्वातंत्र्याचे समर्थक असल्याचा आरोप करतो. पण, दलाई लामा म्हणतात, की ते केवळ तिबेटच्या स्वायत्ततेचे आणि स्थानिक बौद्ध संस्कृतीचे संरक्षक आहेत.
काय म्हणाले चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते -
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे, की दलाई लामा यांच्याशी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. पण बीजिंग तिबेटच्या दर्जासंदर्भात चर्चा करणार नाही. वांग बुधवारी नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले, "दलाई लामांच्या बाजूने असलेल्यांनी चीनच्या विभाजनासंदर्भातील आपली भूमिका सोडायला हवी. फुटीरतावादी कारवाया थांबवायला हव्यात आणि केंद्र सरकार तथा चिनी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी ठोस कामे करायला हवीत."