तिबेटच्या सीमेवर चीनच्या लांब पल्ल्याच्या तोफा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:25 AM2019-01-09T05:25:53+5:302019-01-09T05:26:25+5:30
संरक्षण सज्जतेत वाढ; भारताने सतर्क राहण्याची गरज; ५0 कि.मी. पर्यंत मारा करण्याची क्षमता
बीजिंग : भारताला लागून असलेल्या तिबेटच्या सीमेवर चिनी लष्कराने हलक्या वजनाचे रणगाडे तैनात केले होते. त्यानंतर आता या सीमेवर चीनने लष्करी वाहनांवर बसविलेल्या व एका जागेहून दुसरीकडे सहज वाहून नेता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या तोफा सज्ज ठेवल्या आहेत. त्यांच्या संरक्षण सज्जतेत वाढ होत असून, त्यामुळे भारताने अधिक सतर्क राहाण्याची गरज आहे.
पर्वतीय भागात अधिक उंचीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) संरक्षण क्षमता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. तिबेटच्या सीमेवर पीएलसी-१८१ या लष्करी वाहनांवर लांब पल्ल्याच्या तोफा बसविण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये डोकलाममध्ये वाद होऊन भारत व चीनचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले होते व कोणीही माघारी जाण्याच्या मन:स्थितीत नव्हते, त्यावेळी या तोफांचा वापर चीनने आर्टिलरी ब्रिगेडमध्ये केला होता.
साँग झोंगपिंग या संरक्षण अभ्यासकाने सांगितले की, चीनने तैनात केलेल्या लांब पल्ल्याच्या तोफांमधून सुमारे ५० कि.मी. अंतरापर्यंत मारा करता येतो. त्यासाठी लेझर तंत्रज्ञान व उपग्रहांचीही मदत घेता येते.
डोकलाम येथे वादंग सुरू असताना चीनने हलक्या वजनाचे रणगाडे व लांब पल्ल्याच्या तोफांच्या आपल्या हद्दीत चाचण्या घेतल्या होत्या. टाईप १५ जातीच्या हलक्या वजनाच्या रणगाड्यांचे इंजिन १००० अश्वशक्तीचे असते. डोंगराळ भागातील लढाईसाठी हे रणगाडे अतिशय उपयुक्त आहेत. (वृत्तसंस्था)
युद्धाच्या तयारीत राहण्याचे निर्देश
च्चीनच्या लष्कराने सदैव युद्धाच्या तयारीत राहिले पाहिजे, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.
च्स्वतंत्र तिबेटच्या मागणीसाठी उठणारे आवाज पूर्णपणे दडपून टाकणे चीनला शक्य झालेले नाही. भारत व इतर देशांसोबत चीनशी असलेल्या सीमातंट्यांवर नजीकच्या काळात तोडगा निघेल, असे दिसत नाही.