चीनी मीडियाने मान्य केला 'मोदी लाटे'चा दबदबा, 'मोदी ब्रॅण्ड'ने गाजवलं 2017 वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:55 PM2017-12-28T15:55:50+5:302017-12-28T16:02:19+5:30
चीनमधील सरकारी मीडिया शिन्हुआच्या वेबसाईटवर प्रकाशित एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 'नरेंद्र मोदी वेव्ह वर्क्स मॅजिक फॉर इंडियाज रुलिंग बीजेपी इन 2017' असं लेखाचं शिर्षक आहे.
नवी दिल्ली - वारंवार प्रत्येक गोष्टीवर भारतावर टीका करत डोळे वटारुन दाखवणा-या चीनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल काहीही मत असलं तरी तेथील सरकारी प्रसारमाध्यमं मात्र पंतप्रधान मोदींचा दबदबा मान्य करत आहेत. चीनमधील सरकारी मीडिया शिन्हुआच्या वेबसाईटवर प्रकाशित एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 'नरेंद्र मोदी वेव्ह वर्क्स मॅजिक फॉर इंडियाज रुलिंग बीजेपी इन 2017' असं लेखाचं शिर्षक आहे. नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्ष पुर्ण केल्याच्या पार्श्वभुमीवर हा लेख लिहिण्यात आला आहे. हे वर्ष संपायला आलं आहे, जर आपण देशातील राजकीय घडामोडींकडे पाहिलं तर भारताच्या राजकारणात 'ब्रॅण्ड मोदी'चा दबदबा राहिला असं लेखात सांगण्यात आलं आहे.
लेखात लिहिलं आहे की, 2014 मधील निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या जबरदस्त यशासोबत मोदी लाटेची सुरुवात झाली. यानंतर भाजपाने अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला. या वर्षात ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली तिथे फक्त मोदीच स्टार चेहरा आणि मास्टर स्ट्रोक म्हणून समोर आले. गेल्या अनेक वर्षांत नरेंद्र मोदी जनतेचे लोकप्रिय नेता म्हणून समोर आले आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे पक्षाने 17 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत 9 विजय मिळवले. ज्यामध्ये उत्तर प्रदेशसोबत नुकतीच पार पडलेली गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक आहे.
लेखात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत करप्रणाली सुधारण्यासाठई उचलण्यात आलेली पाऊलं आणि जीएसबद्दलही लिहिण्यात आलं आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी आणि जीएसटी निर्णयाला जोरदार विरोध केला, मात्र नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे जनतेवर याचा काहीच फरक पडला नसल्याचं लेखात सांगण्यात आलं आहे.
लेखात पुढे लिहिलं आहे की, उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य असल्या कारणाने केंद्रात त्याचं विशेष महत्व आहे. तिथे प्रादेशिक पक्ष समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाची चांगली पकड होती. भाजपाने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री उमेदवाराची घोषणा केली नसतानाही दमदार विजय मिळवत इतर पक्षांच्या हातातून विजय अक्षरक्ष: खेचून घेतला. याचं सर्व श्रेय नरेंद्र मोदींना जातं, कारण निवडणुकीवेळी स्टार चेहरा म्हणून ते जनतेसमोर आले होते.