चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे चीनचे धाबे दणाणले
By admin | Published: October 27, 2016 05:22 PM2016-10-27T17:22:43+5:302016-10-27T17:22:43+5:30
पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठी पाठिंबा देऊन चीन भारतावर वेळोवेळी कुरघोडी करत असल्याचं समोर आलं आहे.
ऑनलाइन लोकमत
चीन, दि. 27- पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांसाठी पाठिंबा देऊन चीन भारतावर वेळोवेळी कुरघोडी करत असल्याचं समोर आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातल्या सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा जोरदार प्रचार सुरू झाला. अनेक चिनी वस्तूंवर भारतातील व्यापारी वर्ग आणि ग्राहकांनी बहिष्कार घातला. त्यामुळे चीनच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला. मात्र आता चीनला जाग आली असून, चीननं भारतानं आमच्या वस्तूंवर सातत्यानं बहिष्कार टाकत राहिल्यास दोन्ही देशांतील संबंध बिघडतील, असा इशारा दिला आहे.
"चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास भारतात चीन करत असलेल्या गुंतवणुकीवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल, यासाठी दोन्ही देशांकडून द्विपक्षीय सहकार्य गरजेचं आहे. मात्र दोन्ही देशांतील लोकांकडून तसा समजुतदारपणा पाहायला मिळत नाही आहे", असे चीनचे भारतातील दूतावास शी लियान म्हणाले आहेत.
"दक्षिण आशियात भारत हा चीनचा सर्वात मोठा भागीदार आहे. तसेच जगातील वस्तू निर्यात करणारा सर्वात मोठा नववा देश आहे. भारतातील अनेक व्यापा-यांनी चीनमध्ये बनवलेल्या फटाक्यांसह अनेक वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील जवळिकीमुळेच भारतात चिनी वस्तूंबाबत नकारात्मक प्रचार होतो आहे. मात्र हा बहिष्काराला कोणताही कायदेशीर आधार नाही. दिवाळी या सणाशी संबंधित वस्तूंवरच हा बहिष्कार मर्यादित नसून त्याचा इतर सणांच्या वस्तूंवरही परिणाम होतो", असं शी लियान यांनी सांगितलं आहे.
दरम्यान 2015मध्ये भारत आणि चीन द्विपक्षीय व्यापार 71.6 अब्ज डॉलरच्या घरात होता, मात्र तो आता 50 अब्ज डॉलर इतका खाली आला आहे. चीन फक्त भारतात 2 टक्केच व्यापार निर्यात करत असल्याचंही शी लियान म्हणाले आहेत.