खतरनाक Video! बेटकुळ्या फुगवायला गेला चिनी रणगाडा; शक्तिप्रदर्शनावेळी बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:13 AM2020-08-18T08:13:51+5:302020-08-18T08:23:20+5:30
चिनी लष्कराच्या युद्धसामग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित; अवघ्या ३० सेकंदांत रणगाडा बुडाला
बीजिंग: आपल्या विस्तारवादी धोरणामुळे जवळपास सर्वच शेजारी देशांशी सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला शक्ती प्रदर्शनादरम्यान मोठा धक्का बसला आहे. लष्करी क्षमतेच्या जोरावर शेजारी देशांना धमकावणाऱ्या चिनी सैन्याच्या युद्ध सरावाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा रणगाडा जमीन आणि पाण्यात अतिशय सक्षम असल्याचा दावा केला जात होता. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये या दाव्याची चांगलीच पोलखोल झालेली दिसून येत आहे.
चीन तैवानवर हल्ला करण्यासाठी जलमार्गाचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अशाच प्रकारच्या पाण्यातूनही आगेकूच करू शकणाऱ्या रणगाड्यांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अँफिबियस रणगाड्यानं जलसमाधी घेतल्यानं त्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पाण्याखाली राहून शत्रूची प्रतीक्षा करायची आणि आवश्यकता भासल्यास अचानक हल्ला करायचा, यासाठी अँफिबियस रणगाडा वापरला जातो. शत्रूच्या वाहनांना, बोटींना नदी पार करण्यापासून रोखण्याचं कामदेखील हा रणगाडा करू शकतो.
Want some fun? Watch this video!🤣
— Hiro Hamakawa (@hiro_hamakawa) August 15, 2020
🇨🇳 PLA sinking tank!🚮 pic.twitter.com/D7Xb19ljiu
अँफिबियस रणगाडा अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र त्यामध्ये कंत्राटदारानं निकृष्ट दर्जाचं स्टील वापरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच त्यानं युद्धसराव सुरू असताना अचानक जलसमधी घेतली. यामुळे चिनी लष्कर वापरत असलेल्या युद्धसामग्रीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. चिनी लष्कर वापरत असलेल्या युद्ध साहित्याची गुणवत्ता किती असा सवाल निर्माण झाला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचीदेखील चर्चा आहे.
दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीनकडून दावा सांगितला जातो. या बेटांवर मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. खनिज तेल, उर्जा संपदा, माशांचं प्रमाण अतिशय जास्त असलेल्या भागांवर चीननं वारंवार दावा केला आहे. त्यामुळेच या भागात चिनी नौदलाची जहाजं, पाणबुड्या टेहळणी करत असतात. या भागात अनेक देशांशी चीनचे खटके उडाले आहेत.