चीनची युद्धाची तयारी! शी जिनपिंग सैनिकांना म्हणाले - मृत्यूला भिऊ नका, युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष द्या
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 28, 2020 02:02 PM2020-11-28T14:02:23+5:302020-11-28T14:05:20+5:30
जिनपिंग यांनी बुधवारी सैनिकांशी साधला संवाद... सध्या चीनचे अमेरिका, तैवान आणि भारताबरोबरचे संबंध तांणले गेले आहेत...
बिजिंग - सैनिकांनो मृत्यूला भिऊ नका आणि युद्ध जिंकण्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा, असे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. ते मिलिट्री कमांडर्सना संबोधित करत होते. चिनी माध्यमांतील वृत्तानुसार, जिनपिंग यांनी बुधवारी आपल्या सैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, युद्ध स्थितीसाठी आवश्यक असलेल्या ट्रेनिंगची अधिक तयारी करा. काही आठवड्यांपूर्वीही जिनपिंग यांनी सैनिकांना संबोधित करताना, याच प्रकारचे वक्तव्य केले होते.
सध्या चीनचेअमेरिका, तैवान आणि भारताबरोबरचे संबंध तांणले गेले आहेत. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यातच नौदलाच्या सैनिकांनाही जिनपिंग यांनी सांगितले होते, की आपण आपले संपूर्ण लक्ष आणि शक्ती युद्धाच्या तयारीसाठी वापरा आणि हाय अलर्टच्या स्थितीत रहा.
Xinhuaने दिलेल्या वृत्तानुसर, मिलिट्री कमांडर्सना जिनपिंग म्हणाले, युद्ध जिंकण्यासाठी अधिक मजबूत ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तसेच मिलिट्री ट्रेनिंग सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि लष्कराचे ते सर्वात महत्वाचे काम आहे. युद्ध काळात अधिक प्रभावी सिद्ध होण्यासाठी ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. चीनचे लक्ष्य पिपल्स लिब्रेशन आर्मीला जगातील सर्वोत्कृष्ट फायटिंग फोर्स बनवणे आहे, असेही राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे.
‘अमेरिकेसोबतचे चीनचे संबंध सुधारणार नाहीत’ -
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासकीय कारकीर्दीत अमेरिकेसोबत आपले संबंध आपोआप सुधारले जातील या भ्रमातून चीनने बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, असे चीन सरकारच्या सल्लागाराने नुकतेच म्हटले आहे.
चीनने तयार राहिले पाहिजे -
ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल अँड काँटेम्पररी चायना स्टडीजचे अधिष्ठाता झेंग योंगनियान यांनी म्हटले की, अमेरिका जी कठोर भूमिका घेणार आहे त्यासाठी चीनने तयार राहिले पाहिजे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’नुसार योंगनियान म्हणाले, अमेरिकेसोबतचे संबंध सुधारण्यासाठी चीन सरकारने प्रत्येक संधीचा उपयोग केला पाहिजे. चांगले जुने दिवस निघून गेले. अमेरिकेतील शीतयुद्धाचे बहिरी ससाणे अनेक वर्षे सक्रिय ठेवले गेले आणि एका रात्रीतून ते दिसेनासे होणार नाहीत, असे झेंग म्हणाले.