जिनपिंगमुळे बायडेन नाराज; जी-२०साठी पंतप्रधान ली कियांग करणार चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:11 AM2023-09-05T11:11:10+5:302023-09-05T11:11:22+5:30
चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक सहकार्यासंदर्भात जी-२० महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
बीजिंग / नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-२० गटाच्या दिल्ली येथे ९ व १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी चीनचे पंतप्रधान ली कियांग त्या देशाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने मी निराश झालो, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक सहकार्यासंदर्भात जी-२० महत्त्वाचे व्यासपीठ आहे. चीन त्याचे महत्त्व जाणत असून जी-२०मध्ये सक्रिय सहभाग घेईल. जी-२०मध्ये परिषदेत ली कियांग हे आपल्या देशाची बाजू मांडतील, असे त्या म्हणाल्या.
मोदी-बायडेन यांच्यात ८ सप्टेंबरला चर्चा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी-२० परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी भारताकडे रवाना होतील. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ८ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यात दोन्ही नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. भारत जी-२०चा अध्यक्ष असून त्यामुळेही दिल्लीतील परिषद महत्त्वाची ठरणार आहे. भारत व व्हिएतनामला भेट देण्यास मी उत्सुक आहे, असे बायडेन यांनी सांगितले.
राजधानीत वाहतुकीवर निर्बंध
नवी दिल्ली : जी-२० शिखर संमेलनासाठी सजलेल्या ल्युटन्स दिल्लीमध्ये विदेशातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट व्यवस्था करण्यात आली असून ८ ते १० सप्टेंबरच्या वीकएंडदरम्यान दिल्लीकरांना मुख्यतः मेट्रोवरच विसंबून राहावे लागणार आहे.
टुरिस्ट मेट्रो कार्ड
विदेशी तसेच भारतातील पर्यटकांसाठी दिल्ली मेट्रो रेल्वेने आजपासून २४ तासांच्या वैधतेच्या २०० रुपयांच्या तर तीन दिवसांच्या वैधतेच्या ५०० रुपयांच्या टुरिस्ट स्मार्ट कार्डची विक्री सुरू केली.
२०७ रेल्वेगाड्या रद्द
जी२० परिषदेमुळे उत्तर रेल्वेने ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत २०७ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तसेच ३६ रेल्वेगाड्यांच्या प्रवासाचा पल्ला तात्पुरता कमी करण्यात येणार आहे. १५ गाड्या वेगळ्या टर्मिनलवर थांबविण्यात येतील. ६ रेल्वेगाड्यांच्या प्रवास मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.