चीनच्या वैज्ञानिकांनी तयार केला सूर्याहून तिप्पट तेजस्वी कृत्रिम तारा!
By Admin | Published: February 11, 2016 02:08 AM2016-02-11T02:08:25+5:302016-02-11T02:08:25+5:30
सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली.
बीजिंग: सूर्याच्या गर्भात असलेल्या उष्णतेहून तिप्पट उष्णतेचा एक अस्थायी कृत्रिम तारा निर्माण करण्याची विस्मयकारक वैज्ञानिक किमयागारी चीनच्या वैज्ञानिकांनी सोमवारी साध्य केली.
‘इस्टिट्यूट आॅफ फिजिकल सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आण्विक सम्मीलन तंत्राने (न्युक्लियर फ्जुजन) प्रायोगिक अणुभट्टीत ४९.९९९ दशलक्ष सेल्सियस एवढ्या प्रचंड उष्णतेचे वस्तुमान तयार करण्यात यश मिळवले. सूर्यासारख्या ताऱ्यांच्या गर्भात अशीच आण्विक प्रक्रिया निरंतर होऊन उष्णतारूपी ऊर्जा उत्सर्जित होत असते. थोडक्यात, चिनी वैज्ञानिकांनी आपल्या सूर्याहून तिप्पट तेजस्वी असा कृत्रिम तारा प्रयोगशाळेत तयार केला. ऊर्जेचा हा स्रोत भूगर्भातील उष्णतेहून ८,६०० पट अधिक तप्त होता.
हा कृत्रिम तारा अस्थायी होता व अवघ्या १०२ सेकंदांनंतर तो ‘विझून’ गेला. ज्या अणुभट्टीत ही आण्विक प्रक्रिया घडवून आणली गेली तिचे आतील चेंबर एवढ्या उष्णतेत जास्त काळ टिकाव धरू शकले नाही. दुष्परिणाम न होणारा शाश्वत ऊर्जास्रोत म्हणून ‘न्युक्लिअर फ्जुजन’चे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत. चिनी वैज्ञानिकांनी सोमवारी केलेला प्रयोग हा याचाच एक भाग होता.
यासाठी चीनमध्ये ईस्ट प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी सुमारे ३७ दशलक्ष डॉलर एवढा खर्च आला. ऊर्जानिर्मिच्या बाबतीत वैज्ञानिकांना एका समस्येवर गेली १५० वर्षांत मात करता आलेली नाही. ती म्हणजे एखाद्या ऊर्जास्रोतातून ऊर्जानिर्मिती करताना खर्ची पडणाऱ्या ऊर्जेहून अधिक ऊर्जा कशी निर्माण करायची. यादृष्टीने ‘न्युक्लिअर फ्जुजन’कडे एक आश्वासक तंत्र म्हणून पाहिले जात असले तरी यातून मिळणारा ऊर्जेचा स्रोत अखंडपणे कसा सुरु ठेवता येईल, याचे कोडे वैज्ञाानिकांना अद्यापही सुटलेले नाही.
नानाविध लाभांचे तंत्रज्ञान
फ्युजन अणुभट्ट्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचे जैविक स्रोतांच्या तुलनेत अनेक लाभ आहेत. यातून कार्बनचे उत्सर्जन अजिबात होत नाही, यातून घातक आण्विक कचरा तयार होत नाही. अणु विखंडनाच्या (न्युक्लिअर फ्युजन) पारंपरिक तंत्रज्ञानासारखे संभाव्य धोकेही नाहीत. अशाप्रकारे निर्माण केलल्या एक किलो वजनाच्या ऊर्जासाधनातून जेवढी ऊर्जा मिळते तेवढी ऊर्जा मिळविण्यासाठी १०० दशलक्ष किलो जैविक ऊर्जासाधने जाळावी लागतील.
आमच्या या प्रयोगातून मिळणारे निष्कर्ष ‘इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्स्परिमेंट रिअॅक्टर’च्या विकासात, अभियांत्रिकी तंत्रज्ञान व पदार्थविज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील पायाभूत संशोधनाच्या दृष्टीने महत्वाचे योगदान ठरू शकेल.
-वॅन युआनशी,
प्रकल्प प्रमुख