चीनची अंतराळ प्रयोगशाळा १९ जुलैला पुन्हा वातावरणात प्रवेश करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:28 AM2019-07-14T04:28:12+5:302019-07-14T04:28:15+5:30
चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
बीजिंग : चीनची प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा तियांगोंग-२ ही १९ जुलै रोजी आपली कक्षा सोडून पुन्हा वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चीनच्या मानवयुक्त अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाने शनिवारी ही माहिती दिली.
प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळेवर नजर ठेवणाऱ्या या कार्यालयाने सांगितले की, अंतराळयानाचा अधिकांश भाग वातावरणात प्रवेश करताच भस्मसात होऊन जाईल. त्याचे काही अवशेष दक्षिण प्रशांत क्षेत्राच्या सुरक्षित समुद्री भागात पडण्याची शक्यता आहे.
तियोंगोंग-२ ही तियोंगोंग-१ ची सुधारित आवृत्ती आहे व खºया अर्थाने पहिली अंतराळ प्रयोगशाळा आहे. १५ सप्टेंबर २०१६ रोजी उन्नत जीवन रक्षक, इंधन भरणे व दुसऱ्यांदा पुरवठा करण्याच्या क्षमता जाणून घेण्यासाठी ही मोहीम होती. शेंझोऊ-११ व चालकरहित तियानझोऊ-१ कार्गो मिशनच्या माध्यमातून चीनने ती हाती घेतली होती. चीन पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत एका मोठ्या मॉड्यूलर अंतराळ स्थानक निर्मितीच्या तयारीत होता. २०२२ पर्यंत स्थायी स्वरूपाचे अंतराळ स्थानक सुरू करण्याची चीनची योजना आहे.
ही अंतराळ प्रयोगशाळा कक्षेमध्ये १००० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करीत आहे. आता हे यान त्याच्या नियोजित काम करण्याच्या कालावधीपेक्षा दोन वर्षे अधिक काळ काम करीत
आहे. (वृत्तसंस्था)\
>अशी आहे ‘तियोंगोंग’
तियोंगोंग-२ची एकूण लांबी १०.४ मीटर असून, त्याचा व्यास ३.३५ मीटर आहे. हे यान अंतराळात पाठवले तेव्हा त्याचे वजन ८.६ टन होते.या प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. यान व त्यावरील सर्व यंत्रसामग्री चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. हे यान पुन्हा वातावरणात प्रवेश करण्यास तयार असून, हेही काम नियोजित पद्धतीने सुरू आहे.