चिनी महिलांना हवे दुसरे अपत्य
By admin | Published: May 31, 2016 05:57 AM2016-05-31T05:57:05+5:302016-05-31T05:57:05+5:30
चीनने अखेर सर्व विवाहित जोडप्यांना दोन अपत्ये होऊ देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वय झालेल्या महिलांकडून कृत्रिम गर्भधारणा उपचारांची मागणी वाढली आहे.
बीजिंग : चीनने अखेर सर्व विवाहित जोडप्यांना दोन अपत्ये होऊ देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वय झालेल्या महिलांकडून कृत्रिम गर्भधारणा उपचारांची मागणी वाढली आहे. यामुळे अशी सेवा देणाऱ्या रुग्णालये/केंद्रांवर ताण पडत आहे.
दोन अपत्यांची इच्छा असूनही गेल्या तीस वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणाच्या अत्यंत कठोर अंमलबजावणीमुळे एकाच अपत्याचे पालक व्हावे लागलेल्या जोडप्यांचे दुसऱ्या अपत्याचे स्वप्न साकारणार आहे. त्यामुळे वय निघून गेलेल्या जोडप्यांना इन व्हिट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानामुळे दुसऱ्या अपत्याचा आनंद घेता येईल. जास्तीतजास्त महिला आमच्याकडे येऊन दुसऱ्या अपत्याबद्दल विचारणा करीत आहेत, असे डॉ. लिवू जिऐन म्हणाले. जिऐन बीजिंगमध्ये आयव्हीएफ तंत्राद्वारे वंध्यत्व निवारण केंद्र चालवतात. लिवू म्हणाले की, सरकारच्या नव्या धोरणानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे अपत्यप्राप्तीसाठी आमच्याकडे येणाऱ्या महिलांच्या संख्येत २० टक्के वाढ झाली आहे. दोन अपत्यांचे नवे धोरण या वर्षीच्या प्रारंभी अंमलात आले. या धोरणापूर्वी माझ्याकडे येणाऱ्या इच्छुकांचे वय सरासरी ३५ होते, आता त्यापैकी बहुतेक जण ४०पेक्षाही जास्त आहेत. त्यातील काही महिला तर पन्नाशीकडे जाणाऱ्याही आहेत, असे लिवू म्हणाले.