हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने निवडला ई-ब्रेसलेटचा पर्याय
By admin | Published: July 1, 2016 04:47 PM2016-07-01T16:47:58+5:302016-07-01T16:53:28+5:30
यंदाच्या हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येणारे इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतल्याचे वृत्त आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 1 - यंदाच्या हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येणारे इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी चेंगराचेंगरीमध्ये दोन हजाराहून अधिक हज यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर जवळपास 800 कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि यात्रेकरूंवर नियंत्रण ठेवता यावं तसंच त्यांची ओळख पटावी यासाठी ई-ब्रेसलेटचा पर्याय निवडण्यात आला आहे. गेल्या वर्षी अनेक मृतांची ओळख देखील पटू शकली नव्हती. ई ब्रेसलेटमुळे तशीच वेळ आल्यास हज यात्रेकरूंची ओळख पटवता येईल अशी बातमी अरब न्यूज व सौदी गॅझेटने दिली आहे.
सौदी अरेबियाच्या अधिकृत माहितीप्रमाणे गेल्या वर्षीच्या दुर्घटनेत 769 जण मरण पावले होते, परंतु आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा आकडा 2,297 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला होता.
ई-ब्रेसलेट वॉटर प्रूफ आहेत, तसेच ती जीपीएस यंत्रणेला जोडलेली आहेत, तसेच त्या व्यक्तिची सर्व माहितीही त्यात असणार आहे. यामुळे यात्रेकरूंच्या गर्दीचं नियंत्रण करता येईल तसेच ओळख पटवता येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.