जॉर्डनमध्ये व्यंगचित्रावरून ख्रिश्चन लेखकाची हत्या
By admin | Published: September 26, 2016 12:36 AM2016-09-26T00:36:37+5:302016-09-26T00:36:37+5:30
जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिश्चन लेखक नाहेद हत्तार (५६) यांची रविवारी न्यायालयाबाहेर बंदूकधाऱ्याने तीन गोळ्या घालून हत्या केली
अम्मान : जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिश्चन लेखक नाहेद हत्तार (५६) यांची रविवारी न्यायालयाबाहेर बंदूकधाऱ्याने तीन गोळ््या घालून हत्या केली. इस्लामचा अपमान करणारे व्यंगचित्र हत्तार यांनी फेसबुकवर शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या खटल्यासाठीच ते न्यायालयात आले होते, असे जॉर्डनची अधिकृत वृत्तसंस्था पेट्रोने म्हटले.
मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. हे न्यायालय अम्मानच्या अब्दाली जिल्ह्यात आहे. हत्तार यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ‘दाढी असलेला माणूस स्वर्गात अंथरुणावर महिलेसोबत पडून धुम्रपान करतोय आणि देवाला माझ्यासाठी दारू आणि काजू आण’, असे सांगतोय असे व्यंगचित्र पोस्ट केले होते. याबद्दल हत्तार यांना १३ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.
दहशतवाद्यांची आणि देव व स्वर्ग याबद्दलच्या त्यांच्या (दहशतवादी) संकल्पनेची थट्टा व्यंगचित्रात होती. त्यात देवत्वाचा कोणत्याही प्रकारे भंग होत नाही, असे म्हणून हत्तार यांनी व्यंगचित्र फेसबुकवरून काढून टाकले होते. परंतु हे व्यंगचित्र नेमके कोणी तयार केले हे कळू शकलेले नाही. जॉर्डनच्या अनेक मुस्लिमांना ते व्यंगचित्र अपमानकारक व त्यांच्या धर्माविरुद्ध असल्याचे वाटले. ते व्यंगचित्र मोठ्या प्रमाणावर शेअर करून हत्तार यांनी कायद्याचे उल्लंघन केले, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.