मृतांना अफगाणिस्तानात नागरिकांची श्रद्धांजली
By admin | Published: June 2, 2017 12:39 AM2017-06-02T00:39:08+5:302017-06-02T00:39:08+5:30
भयंकर मोठ्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना गुरुवारी अफगाण लोकांनी श्रद्धांजली वाहिली. हल्लेखोराने बुधवारी ट्रकबॉम्बचा वापर
काबूल : भयंकर मोठ्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना गुरुवारी अफगाण लोकांनी श्रद्धांजली वाहिली. हल्लेखोराने बुधवारी ट्रकबॉम्बचा वापर केला त्यात ९० जण ठार, तर ४५० पेक्षा जास्त जखमी झाले.
अफगाणिस्तानातून २०१४ मध्ये विदेशी सैन्याने माघार घेतल्यानंतर झालेला हा सर्वात मोठा हल्ला ठरला. जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी शेकडो लोक रुग्णालयांबाहेर वाट पाहत उभे आहेत. येथे भारतासह अनेक देशांचे दूतावास असलेल्या व प्रचंड बंदोबस्त असलेल्या भागात हल्लेखोराने सकाळी स्फोटके भरलेल्या ट्रकला घुसवले. मृतांत महिला, मुले, अफगाण सुरक्षा जवान व नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. हल्ल्यासाठी टँकर ट्रकचा वापर झाला. त्यात स्फोटके दडवून ठेवली होती, असे अंतर्गत मंत्र्यांचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले. स्फोटामुळे १५ फूट खोल खड्डा पडला. जर्मन दूतावासाचे यात मोठे नुकसान झाले. (वृत्तसंस्था)
हक्कानी, पाकचा हात
काबूल : काबूलमध्ये बुधवारी झालेल्या ट्रकबाँब हल्ल्यामागे अफगाणिस्तानातील हक्कानी गट आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा हात असल्याचे अफगाणिस्तानची गुप्तचर संघटना एनडीएसने गुरुवारी येथे म्हटले.