अफगाणिस्तानातील जलालाबाद शहर तालिबानच्या ताब्यात, आता फक्त काबुल उरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:00 PM2021-08-15T14:00:37+5:302021-08-16T10:59:56+5:30
Afghanistan Taliban News: तालिबानने अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि उत्तर भागावर ताबा मिळवला आहे.
काबूल: अमेरिकन सैन्य परतल्यानंतर अफगाणिस्तानाततालिबानचे दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालिबाननेअफगाणिस्तानच्या जवळपास 80 टक्के भागावर ताबा मिळवलाय. दरम्यान, आता तालिबानने अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांपैकी असलेल्या जलालाबादवरही आपल्या झेंडा फडकावला आहे. यानंतर आता काबुल देशाच्या पूर्व भागापासून वेगळा झालाय.
तालिबानने रविवारी सकाळी काही फोटो शेअर केले होते. यात काही तालिबानी नांगरहार प्रांताची राजधानी असलेल्या जलालाबादमधील गव्हर्नरच्या ऑफीसमध्ये जाताना दिसत आहेत. या परिसरातील खासदार अबरारुल्ला मुरादने एसोसिएटिड प्रेसला सांगितल्यानुसार, तालिबान्यांनी जलालाबादवर ताबा मिळवला आहे. आता सरकारकडे प्रमुख शहरांमध्ये फक्त काबूल उरला आहे.
मागच्याच आठवड्यात तालिबानने देशातील मोठ्या शहरांवर ताबा मिळवला होता. यात देशातील चौथे सर्वात मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवरसह उत्तर अफगाणिस्तानातील काही शहरांचा समावेश आहे. त्यापूर्वी, तालिबानने लढाई केल्याशिवाय मध्य दाइकुंदी राज्य आपल्या ताब्यात घेतलं. तर, देशातील दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे शहर असलेल्या हेरात आणि कंधारवरही आता तालिबानचा ताबा आहे. आता मोठ्या शहरांमध्ये फक्त काबुल उरले आहे.