सिरियामध्ये नागरी युद्धात ३,८०,००० जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 04:33 AM2020-01-05T04:33:04+5:302020-01-05T04:33:08+5:30
सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत.
बैरूत : सिरियामध्ये मागील ९ वर्षे नागरी युद्ध सुरू असून, यात ३,८०,००० जण ठार झाले आहेत. यात १,१५,००० नागरिकांचा समावेश आहे. मानवी हक्क सिरियन मंडळाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. मृतांमध्ये २२,००० बालके व १३,००० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे.
दारा या शहरात १५ मार्च २०११ रोजी सरकारविरोधी आंदोलन चिघळल्यानंतर या देशातील स्थिती कायम बिघडलेलीच आहे. दारामधील आंदोलनाचे लोण देशाच्या इतर भागांमध्ये गेले व सर्वत्र स्थिती अस्थिरतेची झाली. जिहादी आणि परकीय शक्ती यांच्या बहुआघाडीय सशस्त्र संघर्षात अब्जावधी डॉलर्सचे नुकसानही झाले आहे. ब्रिटनमधील मानवी हक्क मंडळाने मागील वर्षीच्या मार्चमध्ये मृतांची संख्या ३,७०,००० असल्याचे जाहीर केले होते.
नव्याने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये १,२८,००० पेक्षा अधिक सिरिया व बिगर-सिरिया समर्थक शासन सेनानींचा समावेश आहे. यात सर्वाधिक सिरियाचे सैनिक आहेत. तथापि, यात लेबनानी शिया समूह हिजबउल्लाहच्या १,६८२ जणांचा समावेश आहे. हा समूह २०१३ पासून सिरियात लढा देत आहे.युद्धात विरोधी व कुर्दीशच्या नेतृत्वाखालील ६९,००० पेक्षा जास्त ठार झाले आहेत. या संघर्षात ६७,००० पेक्षा जास्त जिहादी ठार झाले आहेत. त्यात मुख्य रूपाने आयएस व हयात तरहीर अल-शाम (एचटीएस)चा समावेश आहे.