अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची धडपड, विमान हवेत असताना तीन जण पडले; पाहा धक्कादायक Video...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:02 PM2021-08-16T17:02:14+5:302021-08-16T17:03:03+5:30
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून पळ काढत आहेत.
अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून पळ काढत आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबुल विमानतळावर नागरिकांची गर्दी झाली आहे. यात अनेकजण आपला जीव वाचवण्यासाठी विमानात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. यातच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. काबुल विमानतळावरुन अफगाण नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर तीन नागरिक विमानात गर्दी असल्यानं जागा मिळाली नाही आणि विमानातून खाली पडले. सोशल मीडियात संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही.
The scene of the fall of three Kabul residents who were hide in the tires or fuselage of an American plane. The tragic incident was so shocking that locals say it made a terrible noise.
— Naqeeb Qadri 🇦🇫 (@NaqeebSays) August 16, 2021
To the world leaders shame on you! #KabulHasFallenpic.twitter.com/CvrhfefU9E
ट्विटरवर अफगाणिस्तानातील काही पत्रकार आणि काही नागरिकांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात काबुल विमानतळावरुन कथित विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर विमान हवेत असताना तीन नागरिक विमानातून खाली पडल्याचं दिसून येत आहे. विमान इतक्या उंचावर होतं की खाली पडलेले तिघंही जीवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. दरम्यान, या व्हिडिओची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. एका स्थानिक वृत्तवाहिनीनं अफगाणी नागरिकांच्या हवाल्यानं केलेल्या दाव्यानुसार विमानातून तीन नागरिक खाली पडले आहेत.
विमानतळावर गोळीबार, तिघांचा मृत्यू
काबुलच्या विमानतळावर प्रवासी टर्मिनलवर सोमवारी गोळीबाराची घटना घडली. यात कमीत कमी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी टर्मिनल इमारतीच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात तीन मृतदेह पाहिले आहेत. सोशल मीडियात व्हायरल होत झालेल्या व्हिडिओंमध्येही गोळीबार सुरू असल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या प्रयत्नात नागरिक विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. विमानाला चारही बाजूंनी घेरुन नागरिक विमानात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असतानाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.