100 वर्षानंतर परग्रहावर वास्तव्य करावं लागेल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ हॉकिंग यांचा दावा
By admin | Published: May 4, 2017 01:43 PM2017-05-04T13:43:21+5:302017-05-04T13:43:21+5:30
हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आणि वाढत्या लोकसंखेच्या संभाव्य धोक्यांमुळे पुढील 100 वर्षात एका नव्या ग्रहावर जाऊन वास्तव्य करण्याची गरज भासणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 4 - पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे असा दावा ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केला आहे. बीबीसीवर सुरु होत असलेल्या एका नव्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की, हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आणि वाढत्या लोकसंखेच्या संभाव्य धोक्यांमुळे पुढील 100 वर्षात एका नव्या ग्रहावर जाऊन वास्तव्य करण्याची गरज भासणार आहे.
‘बीबीसी टीव्ही’च्या ‘टुमारोज वर्ल्ड’ या मालिकेतल्या ‘एक्स्पिडिशन न्यू अर्थ’ या डॉक्युमेंटरीमध्ये शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांचा जुना विद्यार्थी क्रिस्टॉफे गैलफॉर्ड जगभ्रमंती करणार आहेत. यावेळी माणूस अंतराळात स्वत:ला कसा जिवंत ठेऊ शकतो याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. याच सीरिजमध्ये हॉकिंग यांनी दावा केला आहे की पृथ्वी आणि मानवाची वेळ जलदगतीने संपत आहे. जिवंत राहण्यासाठी पृथ्वी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. येत्या काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य राहणार नसल्यानं माणसाला हे पाऊल उचलावंच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.
गेल्याच महिन्यात हॉकिंग यांनी चेतावणी दिली होती की, तंत्रज्ञानासोबत जलगतीने वाढत चाललेली मानवाची आक्रमक वृत्ती आपल्याला न्यूक्लिअर किंवा जैविक युद्धाच्या माध्यमातून नष्ट करु शकते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होत चालला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन राहण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावल्याचा दावाही हॉकिंग्ज यांनी केला.
माणसानं केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरु शकते, असंही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल, असाही दावा त्यांनी केला.