मंगळ ग्रहावर खेकडा दिसल्याचा दावा
By admin | Published: August 6, 2015 10:42 PM2015-08-06T22:42:01+5:302015-08-06T22:42:01+5:30
मंगळावर पाणी असल्याचे दावे आतापर्यंत अनेकवार करण्यात आले; पण तिथे जीवसृष्टी आहे की नाही याची खात्री अद्याप पटलेली नसताना मंगळावरील खडकावर
वॉशिंग्टन : मंगळावर पाणी असल्याचे दावे आतापर्यंत अनेकवार करण्यात आले; पण तिथे जीवसृष्टी आहे की नाही याची खात्री अद्याप पटलेली नसताना मंगळावरील खडकावर खेकडा आढळल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. एलियन्सचा शोध घेणाऱ्या वेबसाईटवर मंगळावरील खेकड्याची आकृती दिसत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वेबसाईटवरील छायाचित्रात मंगळावरील एका विशाल खडकाच्या मध्यभागी खेकड्यासारखी आकृती दिसत आहे. १९८० च्या दशकात अमेरिकेतील एलियन चित्रपटात अशाच प्रकारे परग्रहावरील जीव दाखविण्यात आला होता. वेबसाईटवर टाकलेले हे छायाचित्र नासाच्या मार्स क्युरिआॅसिटी रोव्हर या मंगळावर असणाऱ्या यानाने घेतले आहे. या छायाचित्राची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे; पण ही आकृती खेकड्यासारखी दिसत असली तरीही प्रत्यक्षात तो खडकाचाच एक भाग आहे, असे संशोधकांनी म्हटले असून, तज्ज्ञांची मागणी फेटाळली आहे.
मंगळावर पाणी व जीवसृष्टी असल्याचे दावे अनेक वेळा केले जात असून, गेली ४० वर्षे मंगळावर मोहीम राबविली जात आहे. कधी मानवी चेहरा दिसत असल्याचा दावा केला जातो, तर कधी पिरॅमिड आढळल्याचा दावा केला जातो; पण ठोस पुराव्याअभावी हे दावे फोल ठरले आहेत.
वॉशिंग्टन : नासाच्या अंतराळातील उपग्रहावर असणाऱ्या कॅमेऱ्याने चंद्राच्या दुसऱ्या बाजूचीही छायाचित्रे घेतली आहेत. १.६ लाख कि. मी. अंतरावरून ही छायाचित्रे घेण्यात आली आहेत. हे छायाचित्र पृथ्वीवर सूर्यप्रकाश असताना घेण्यात आले असून, त्यात चंद्र पृथ्वीसमोर आहे.
चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून, चंद्राचा पृथ्वीभोवती फिरण्याचा व स्वत:च्या अक्षाभोवती फिरण्याचा वेग एकच असल्याने त्याची एकच बाजू पृथ्वीवरून दिसते.
पृथ्वीपासून १.६ लाख कि. मी. अंतरावर फिरणाऱ्या उपग्रहावर द अर्थ पॉलिक्रोमेटिक इमेजिंग कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्याचे सूर्यप्रकाशातील पृथ्वीवर कायम लक्ष असते. वर्षातून दोनदा हा कॅमेरा पृथ्वी व चंद्र अशी दोघांचीही छायाचित्रे घेऊ शकतो. कारण उपग्रहाची कक्षा चंद्राच्या कक्षेला पार करून जाते.
चंद्राची दुसरी बाजू सर्वप्रथम १९५९ साली सोविएत लुना ३ यानाने पाठविलेल्या पहिल्या छायाचित्रात दिसली होती. त्यानंतर नासाने ही चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे अधिक तपशीलवार मिळवली आहेत. चंद्राची दुसरी बाजू अंधारी आहे.
(वृत्तसंस्था)