पंजशीरमध्ये तालिबाननं पुन्हा मार खाल्ला; ४० दहशतवाद्यांचे मृतदेह सोडून पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:01 PM2021-09-03T12:01:01+5:302021-09-03T12:03:01+5:30
तालिबानचे दहशतवादी पंजशीरमध्ये सातत्यानं अपयशी; नॉर्दर्न अलायन्सकडून कडवी लढत
काबूल: अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला अद्याप पंजशीर काबीज करता आलेला नाही. पंजशीरचे योद्धे तालिबानच्या दहशतवाद्यांचा समर्थपणे मुकाबला करत आहेत. त्यामुळे एका बाजूला तालिबान सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे पंजशीरमध्ये त्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचं दिसत आहे. पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्सचे योद्धे आणि तालिबानी दहशतवादी यांच्यात संघर्ष सुरू आहे.
पंजशीरच्या विविध भागांत घुसखोरी करण्याचा प्रयत्न तालिबान्यांकडून सुरू आहे. मात्र अद्याप तरी तालिबान्यांना यश आलेलं नाही. पंजशीरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहोत आणि घुसखोरीचे सर्व प्रयत्न उधळून लावले जात असल्याची माहिती नॉर्दर्न अलायन्सकडून देण्यात आली आहे.
तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स शोतुलमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात येत आहे. नॉर्दर्न अलायन्सच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या ४० हून अधिक दहशतवाद्यांचे मृतदेह शोतुलमध्ये पडले आहेत. ते परत देण्याचे प्रयत्न नॉर्दर्न अलायन्सकडून सुरू आहेत. मात्र आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेह सोडून तालिबान्यांनी पळ काढला आहे. गुरुवारी दोन्ही बाजूनं कोणताही गोळीबार झालेला नाही.
तालिबानी दहशतवाद्यांवर दुहेरी संकट
नॉर्दर्न अलायन्सचे योद्धे हार मानायला तयार नाहीत. तालिबानला ते अतिशय कडवी झुंज देत आहेत. तालिबानचे अनेक दहशतवादी संघर्षात जखमी झाले आहेत. मात्र राजधानी काबूलमध्ये त्यांनी उपचारही मिळत नाहीत. काबूलमधल्या अनेक रुग्णालयांतील कर्मचारी वर्ग कामावर परतलेला नाही. त्यामुळे तालिबानला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.