तैवानच्या संसदेत हाणामारी, साहित्याची नासधूस, अनेक सभासद जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:08 PM2020-07-15T13:08:32+5:302020-07-15T13:10:19+5:30
विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली.
ताईपै - संसदेच्या सभागृहामध्ये हाणामारी होण्याचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत. दरम्यान, आता तैवानच्या संसदेमध्ये सभासदांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत संसदेच्या इमारतीच्या काचा तुटल्या असून, काही सभासद जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली. विरोधी कोउमितांग पक्षाच्या सदस्यांनी नामांकन भरण्यासाठी जात असलेले चेन चू यांना संसदेच्या मुख्य चेंबरमध्ये जाण्यापासून रोखले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
या हाणामारीमध्ये कोऊमितांग पक्षाच्या एका सभासदाला गंभीर दुखापत झाली. तसेच संसदेच्या इमारतीच्या काचांचे नुकसान झाले. तसेच दोन्ही पक्षांचे अनेक सभासद जखमी झाले. तैवानची संसद हाणामारीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथे वादग्रस्त मुद्द्यांवरून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत असतात. चार वर्षांपूर्वी सरकारची सुधारणाविषयक धोरणे आणि निवृत्तीवेतनातील कपातीच्या मुद्द्यावरून तैवानच्या संसदेत जोरदार हाणामारी झाली होती.
दरम्यान, चेन चू यांची कंट्रोल युआनचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ही संस्था सरकारच्या अन्य शाखांवर नजर ठेवण्याचे काम करते. मात्र कोऊमितांग पक्षाने या नियुक्तीला विरोध केला होता. कंट्रोल युआनमधील २७ सदस्यांपैकी २४ जण हे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे निकटवर्तीय आहेत. आम्ही भ्रष्ट लोकांच्या या यादीचा विरोध करतो. तसेच ही यादी मागे घेण्याचे मागणी करतो, असे कोऊमितांग पक्षाने सांगितले.