हवामान बदल योजनेचा गरीब देशांना लाभ व्हावा
By admin | Published: April 24, 2016 04:09 AM2016-04-24T04:09:56+5:302016-04-24T04:09:56+5:30
कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवून पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी भारतासह १७५ देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली आहे.
संयुक्त राष्ट्रे : कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आटोक्यात ठेवून पृथ्वीवरील वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी भारतासह १७५ देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेली कृती योजना गरीब देशांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि गरीब देशांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे, यावर भारताने भर दिला आहे.
उच्चस्तरीय परिषदेत बोलताना भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, काही देश अतिशय विलासी जीवनशैली अवलंबीत आहेत. त्यामुळे एके दिवशी पृथ्वी राहण्यायोग्य राहणार नाही. व पृथ्वी, पर्यायाने मानवाचा विनाश होईल. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला. पॅरिस कराराची अंमलबजावणी करताना त्याचा फायदा केवळ श्रीमंत देशांना न होता खरा फायदा गरीब देशांना झाला पाहिजे. त्या दृष्टीने कृती योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जावडेकर आणि ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)