क्लिंटन यांना क्लीन चिट
By admin | Published: November 8, 2016 03:23 AM2016-11-08T03:23:51+5:302016-11-08T18:49:02+5:30
फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनने (एफबीआय) डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी मोठा दिलासा दिला
वॉशिंग्टन : फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनने (एफबीआय) डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी मोठा दिलासा दिला. राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार असताना, एफबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे क्लिंटनसमर्थक खुशीत आहेत.
नव्याने हाती लागलेल्या ईमेल्सची तपासणी केली असता क्लिंटन यांच्यावर गुन्हेगारी
आरोप ठेवले जाऊ शकत नाहीत,
असे एफबीआयने म्हटले. हिलरी क्लिंटन यांच्याबाबत आम्ही गेल्या जुलै महिन्यात जो निष्कर्ष काढला होता त्यात आम्ही आता जो
आढावा घेतला आहे. त्यामुळे तो बदलण्याची गरज नाही, असे एफबीआयचे संचालक जेम्स बी कोमी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले.
क्लिंटन यांनी त्या परराष्ट्र मंत्री असताना ईमेल्ससाठी खासगी सर्व्हरच्या केलेल्या वापराची चौकशी नुकत्याच सापडलेल्या ईमेल्सनंतर करण्यात आली. हे ईमेल्स सापडल्यानंतर एफबीआयने चौकशी करण्याचे जाहीर केल्यावर क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून क्लिंटन यांच्यावर जोरदार टीका होत होती व क्लिंटन यांच्या लोकप्रियतेमध्येही घट झाली होती. एफबीआयने क्लिंटन यांना दिलासा दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर टीका केली व स्वार्थी व्यवस्थेने क्लिंटन यांना पाठिशी घातल्याचा आरोप केला.
हिलरी क्लिंटन यांच्या मदतनीस हुमा अबेदिन यांच्यापासून वेगळे
राहात असलेले त्यांचे पती व माजी काँग्रेस सदस्य अॅन्थोनी विनर
यांच्या लॅपटॉपवर सापडलेल्या ईमेल्सनंतर एफबीआयने पुन्हा चौकशी सुरू केल्याचे पत्र
२८ आॅक्टोबर रोजी कोमी यांनी काँग्रेसला पाठवले होते. माझ्या २८ आॅक्टोबरच्या या पत्रानंतर एफबीआयची तुकडी एवढ्या मोठ्या संख्येतील ईमेल्सचा आढावा अहोरात्र काम करून घेत आहे, असे कोमी म्हणाले. विनर यांच्या लॅपटॉपवर ६,५०,००० ईमेल्स असल्याचे कोमी म्हणाले. (वृत्तसंस्था)
डोनाल्ड ट्रॅम्प यांनी प्रसिद्ध अमेरिकन कंपनी आयबीएमने मिनेसोटातील ५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकून त्यांचे रोजगार भारत आणि इतर देशांना दिल्याचा आरोप केला आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांवर ३५ टक्के कर आकारीन, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प प्रशासन अमेरिकेतून बाहेर देशांत जाणारे रोजगार थांबवील, मिनेसोटातील रोजगारही आम्ही थांबवू, असे ट्रम्प मिनेपोलीसमध्ये सभेत रविवारी म्हणाले.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना, दोन्ही उमेदवार हे इस्लामविरोधी असल्याने त्यांना मतदान करू नये, असे आवाहन इसिस या दहशतवादी संघटनेने केले आहे.
मुस्लीम मतदारांनी मतदान करू नये, असेही इसिसने म्हटले आहे. मतदानाच्या आधी अमेरिकेवर हल्ले करण्याची धमकी इसिसने याआधी दिली असून, त्यामुळे सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्क, टेक्सास आणि सिएटल या शहरांतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.