परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 04:45 AM2019-11-15T04:45:30+5:302019-11-15T04:46:11+5:30
काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे.
इस्लामाबाद : काश्मिरात भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी काही काश्मिरी लोकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानी यांच्यासारखे दहशतवादी हे पाकिस्तानात हीरो होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानातील एक राजकीय नेते फरतुल्लाह बाबर यांनी बुधवारी टष्ट्वीटरवर शेअर केलेल्या तारीख नसलेल्या क्लिपमध्ये मुशर्रफ असे म्हणताना दिसत आहेत की, १९७९ मध्ये आम्ही पाकिस्तानला लाभ देण्यासाठी अफगाणिस्तानत धार्मिक दहशतवाद सुरू केला. जगभरातून मुजाहिदीन आणले. त्यांना प्रशिक्षित केले. शस्त्रास्त्रे पुरविली. ते आमचे हीरो होते. हक्कानी आमचा हीरो होता. ओसामा बिन लादेन आमचा हीरो होता. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे. नायकांनी खलनायकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. काश्मीरमधील अशांततेबाबत ते म्हणाले की, काश्मिरातून येणाऱ्यांचे येथे स्वागतच झाले. त्यांना आम्ही प्रशिक्षित करीत होतो. त्यांचे समर्थन करीत होतो. भारतीय सैन्यासोबत लढू इच्छिणाऱ्यांना आम्ही त्यांना मुजाहिदीन मानले.