खाण दुर्घटनेविरुद्ध तुर्कस्तानात बंद

By admin | Published: May 16, 2014 05:06 AM2014-05-16T05:06:59+5:302014-05-16T05:06:59+5:30

तुर्कस्तानच्या खाण दुर्घटनेतील बळींची संख्या २८२ झाली असून अद्यापही अनेक जण खाणीतच अडकलेले आहेत.

Close to the mining accident in Turkistan | खाण दुर्घटनेविरुद्ध तुर्कस्तानात बंद

खाण दुर्घटनेविरुद्ध तुर्कस्तानात बंद

Next

सोमा : तुर्कस्तानच्या खाण दुर्घटनेतील बळींची संख्या २८२ झाली असून अद्यापही अनेक जण खाणीतच अडकलेले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी देशातील ४ मोठ्या कामगार संघटनांनी गुरुवारी लाक्षणिक बंद पाळला. खर्चात कपात करण्यासाठी कामगारांचे जीव धोक्यात घालण्यात आल्याचे सांगून या दुर्घटनेस जबाबदार असणार्‍यांना कडक शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. तुर्कस्तानच्या मनिसा प्रांतातील सोमा शहराजवळील कोळसा खाण मंगळवारी भीषण स्फोटानंतर कोसळली होती. नफेखोरी वृत्तीतून शेकडो कामगारांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले, असा आरोप करून या संघटनांनी निषेध म्हणून काळे कपडे घालण्याचे आवाहन केले. तुर्कस्तानात खाण दुर्घटना नित्याच्याच असून मंगळवारच्या दुर्घटनेने देशभर रोष पसरला आहे. बुधवारी अंकारा व इस्ताम्बुलमध्ये शेकडो निदर्शकांची पोलिसांशी चकमक झाली. निदर्शकांनी सरकार आणि खाण उद्योगावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या दुर्घटनेमुळे पंतप्रधान तईप इर्डोगान यांच्यावरील दबाव वाढला आहे. (वृत्तसंस्था) दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी सोमा प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. पंतप्रधानांनी अशा दुर्घटना होत असतात, असे सांगून सरकारवरील निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला. मंगळवारी खाणीत भीषण स्फोट झाल्यानंतर अद्यापही किती कामगार खाणीत अडकलेले आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. इलेक्ट्रिकल दोषामुळे ही दुर्घटना घडल्याचे मानले जाते. खाणीच्या संचालकांनी खाणीत ९० लोक अडकलेले असल्याचे म्हटले आहे. मात्र, बचाव कर्मचारी ही संख्या कितीतरी अधिक असण्याची भीती व्यक्त करीत आहेत. बळींपैकी बहुतांश जणांचा मृत्यू गुदमरल्याने झाला.

Web Title: Close to the mining accident in Turkistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.