Stan Lee Death: स्पायडरमॅन, आयर्नमॅनचा जनक कालवश; स्टेन ली यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 07:11 AM2018-11-13T07:11:22+5:302018-11-13T10:15:35+5:30
अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा काळाच्या पडद्याआड
लॉस एंजेलिस: जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणाऱ्या स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळख होती.
स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीनं दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. १९६१ मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केलं. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. स्टेन ली काही हॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील दिसले होते.