दहशतवादविरोधात सहकार्याची साद
By admin | Published: August 16, 2015 10:27 PM2015-08-16T22:27:10+5:302015-08-16T22:27:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी येथे आगमन झाले. या महत्वाच्या दौऱ्यात ते व्यापार आणि दहशतवादविरोधातील
अबु धाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त अरब अमिरातच्या (युएई) दोन दिवसांच्या दौऱ्यावर रविवारी येथे आगमन झाले. या महत्वाच्या दौऱ्यात ते व्यापार आणि दहशतवादविरोधातील मोहिमेसारख्या महत्वाच्या क्षेत्रात सहकार्याबराबर भारताला आकर्षक गुंतवणूक करण्याचा देश म्हणून सादर करतील.
आगमन होताच मोदी यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले,‘मी या दौऱ्याबद्दल खूप आशावादी आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि युएईतील संबंधांना प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास वाटतो.’ तब्बल ३४ वर्षांनंतर संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. १९८१ मध्ये पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी येथे आल्या होत्या. मोदी यांचे येथील विमानतळावर आगमन होताच अबुधाबीचे राजपुत्र व त्यांच्या पाच भावांनी शिष्टाचार बाजुला ठेवून मोदी यांचे स्वागत केले.
मोदी यांनी स्थानिक दैनिकात दिलेल्या मुलाखतीत सोमवारी संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुख नेत्यांशी होणाऱ्या चर्चेचे स्पष्ट संकेत दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘युएई व्यापार आणि दहशतवादविरोधातील मोहिमेत भारताचा प्रमुख भागीदार व्हावा, असे आम्हाला वाटते.’ मोदी यांनी म्हटले आहे की दहशतवादासह सुरक्षा आणि लष्करीदृष्ट्या दोन्ही देशांची काळजी सारखीच आहे.
(वृत्तसंस्था)