नेपाळमध्ये विमान अपघातात सहवैमानिक, पोलिसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 04:12 AM2019-04-15T04:12:00+5:302019-04-15T04:12:06+5:30
नेपाळच्या एव्हरेस्ट परिसरातील लुक्ला विमानतळावर रविवारी एक छोटेखानी प्रवासी विमान उड्डाण करीत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर धडकले.
काठमांडू : नेपाळच्या एव्हरेस्ट परिसरातील लुक्ला विमानतळावर रविवारी एक छोटेखानी प्रवासी विमान उड्डाण करीत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर धडकले. या अपघातात सहवैमानिक व दोन पोलीस ठार झाले आहेत.
समीट एअर या कंपनीच्या विमानाला झालेल्या या अपघातात सहवैमानिक एस. धुंगाना, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामबहादूर खडका, रुद्रबहादूर श्रेष्ठ, असे तीन जण मरण पावले आहेत. रुद्रबहादूर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हेलिकॉप्टरचे चालक कॅप्टन आर.बी. रोकाया व कॅ. गुरुंग हे जखमी झाले. त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. विमानाने धडक दिलेली हेलिकॉप्टर्स मनांग एअर व श्री एअर या कंपन्यांची होती. लुक्ला विमानतळाला एव्हरेस्टवीर तेनसिंग-हिलरी यांचे नाव देण्यात आले आहे. येथील धावपट्टी फक्त ५२७ मीटर लांबीची आहे. (वृत्तसंस्था)
..............