पाकिस्तानात कराची एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली; तीन मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:01 PM2023-04-27T18:01:12+5:302023-04-27T18:01:39+5:30
कराची एक्स्प्रेस ही ट्रेन सिंध प्रांतातील खैरपुर जिल्ह्याच्या तांदो खान भागात आली असताना ही घटना घडली आहे.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास कराची एक्स्प्रेसच्या एका बोगीला भीषण आग लागली. यामध्ये चार मुलांसह सात जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनुसार जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तान रेल्वेच्या अधिकाऱ्यांने सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. ऑक्टोबर 2019 मध्येही तेजगाम एक्स्प्रेसमध्ये अशीच आग लागली होती. या घटनेत 73 जणांचा मृत्यू झाला होता.
कराची एक्स्प्रेस ही ट्रेन सिंध प्रांतातील खैरपुर जिल्ह्याच्या तांदो खान भागात आली असताना ही घटना घडली आहे. पोलिसांनुसार सहा जणांचे मृतदेह ओळखता येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे.
कराची एक्स्प्रेस कराचीहून लाहोरला जात होती. आग लागलेला कोच हा एसी होता. आग लागल्यानंतर काही वेळात ही ट्रेन तांदो खान स्टेशनवर थांबविण्यात आली. जवळपास ४० मिनिटांनी फायरब्रिगेडला आगीवर नियंत्रण मिळविता आले.
एका ७० वर्षीय महिलेने आग लागल्याने जीव वाचविण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली, तिचाही मृत्यू झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाहीय. बोगी पुढील तपासासाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.