अंडे उचलायला गेलेल्या महिलेवर कोंबड्याने चढविला हल्ला; मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:48 PM2019-09-02T18:48:55+5:302019-09-02T18:51:56+5:30
महिला पाळलेल्या कोंबड्यांच्या भांड्यातून अंडे उचलत होती. यावेळी एका चिडलेल्या कोंबड्याने तिच्यावर मागून हल्ला केला.
कॅनबेरा : पाळलेल्या कोंबड्यांची अंडी उचलायला गेलेल्यांवर चोच मारल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, त्यांच्या हल्ल्यात प्राण गेल्याचे कधी ऐकिवात नाही. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंडे उचलणाऱ्या मालकिनीवर कोंबड्याने हल्ला केला यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.
ही वृद्ध महिला पाळलेल्या कोंबड्यांच्या भांड्यातून अंडे उचलत होती. यावेळी एका चिडलेल्या कोंबड्याने तिच्यावर मागून हल्ला केला. त्याने तिच्या पाठीवर जोरात चोच मारली. यामुळे या महिलेची नस फुटली आणि त्यातून रक्तस्राव सुरू झाला. मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून गेल्याने या महिलेचा मृत्यू झाला.
म्हातारपणी नस कडक होते. त्यावर जोरात घाव बसला तर फुटते. या महिलेसोबतही असेच झाल असेल असे पाळीव प्राण्यांवर संशोधन करत असलेल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले. अॅडलेड विद्यापीठाचे संशोधक रॉजर ब्यार्ड यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, अशी अनेक उदाहरणे मिळाली आहेत, ज्यातून जनावरांनी हल्ला केल्याने मानसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना वृद्धांसाठी इशारा आहे.
काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारची एक घटना ऑस्ट्रेलियातच घडली होती. पाळलेल्या मांजरीने पंजा मारल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेची पायाची नस फुटल्याने रक्त वाहून गेले यामुळे तिचा मृत्यू झाला.