विनोदी अभिनेत्याची वेदनादायी अखेर
By admin | Published: August 13, 2014 02:45 AM2014-08-13T02:45:43+5:302014-08-13T02:45:43+5:30
आॅस्कर विजेते हॉलीवुड अभिनेते रॉबिन विल्यम्स मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे
लॉस एंजल्स : आॅस्कर विजेते हॉलीवुड अभिनेते रॉबिन विल्यम्स मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. ‘गुड विल हंटिंग’, ‘डेड पोएट्स सोसायटी’ व ‘ गुड मार्निंग व्हिएतनाम’ या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय ठरला होता. विनोदी अभिनयात तर त्यांचा कोणीही हात धरू शकत नव्हते. त्यांची अकाली एक्झिट रसिकांच्या मनाला चटका लावून गेली.
टिबुरोन, कॅलिफोर्निया येथील राहत्या घरी ते सोमवारी बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांची श्वासोच्छ्वास थांबलेला होता. आपत्कालीन कर्मचारी आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटते. श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विल्यम्स यांच्या प्रसिद्धी अधिकारी मारा बुक्सबॉम यांनी सांगितले की, विल्यम्स यांना मागील काही काळापासून नैराश्याने ग्रासले होते. ही एक दु:खद आणि अकस्मात झालेली हानी आहे.
विल्यम्स यांच्या पत्नी सुसान श्नाइडर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, आज सकाळी मी माझा पती व सर्वात चांगला मित्र तर जगाने आपला सर्वात आवडता कलाकार आणि सुंदर व्यक्ती गमावली. मी अंतर्बाह्य कोलमडले आहे. विल्यम्स यांचे व्यवस्थापक म्हणून गेली ३५ वर्षे काम करीत असलेले डेव्हिड स्टेनबर्ग म्हणाले की, कोणीही रॉबीन विल्यम्सप्रमाणे जगाला हसविलेले नाही. माझा भाऊ, माझा मित्र आणि माझे सर्वस्व असलेल्या या माझ्या साथीदाराला मी सदैव स्मरणात ठेवेन. चारवेळा आॅस्करसाठी नामांकन झालेल्या विल्यम्स यांना १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुडविल हंटिंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा आॅस्कर मिळाला होता. याशिवाय त्यांना दोन एमी, चार ग्लोडन ग्लोब, पाच ग्रॅमी आणि दोन एसएजी पुरस्कार मिळाले होते. ते अलीकडे ‘द क्रेझी वन्स’ या मालिकेत दिसले होते. त्यांच्या निधनाने हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. (वृत्तसंस्था)