संवाद हरपला! आईच्या हातातला मोबाइल करतोय मुलाचा घात; काय आहे धक्कादायक?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 08:08 AM2024-07-06T08:08:49+5:302024-07-06T08:09:10+5:30
मोबाइलवरील एका मिनिटामुळे मुलांशी १६ टक्के संवाद हरपला, बाल्य विकास नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन माता आणि अर्भकांचा समावेश होता.
ऑस्टिन - आईने मोबाइलवर घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचा मुलांवर परिणाम होत आहे. आई मोबाइलवर एक मिनिट घालवते याचा अर्थ ती तिच्या मुलांशी जवळपास १६ टक्के शब्द कमी बोलते. यातून मुले उशिरा बोलण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असा धक्कादायक निष्कर्ष नुकत्याच प्रसिद्ध एका संशोधनातून पुढे आला आहे. टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जर एखादी आई स्मार्ट फोन वापरत असेल तर ती आपल्या मुलांशी कमी बोलते. दररोज दीड ते तीन वर्षे वयोगटातील सुमारे १० लोक या प्रकारची समस्या घेऊन रुग्णालयात पोहोचत आहेत.
संयुक्त कुटुंबच ठरतेय फायद्याचे
मुलांमध्ये उशिरा बोलायला लागण्याची समस्या विभक्त कुटुंबांमध्ये आणि काम करणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये जास्त आहे. संयुक्त कुटुंबात राहणारे मूल सतत नवनवीन गोष्टी ऐकत असते आणि कुटुंबातील सदस्यांच्या हालचालींचे निरीक्षण करत असते. त्यामुळे मुलास नऊ महिन्यांत भाषेचे आकलन होते.
मुलाला फक्त इशारे कळतात
आम्ही नोकरी करणारे पालक आहोत, व्यवसाय आहे. दिवसभर मुलासोबत ऑनलाइन काम पाहावे लागते. त्यामुळे मोबाइलवर सतत काम करावे लागते. काम करताना आम्ही मुलाशी नीट संवाद साधला नाही. त्यातून मुलगा वेळेवर बोलायला शिकू शकला नाही. फक्त इशारे त्याला समजतात. आता मी काम सोडले आहे आणि माझा पूर्ण वेळ मुलाला देत आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्त केली. त्यावरून ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज येतो.
काय आहे धक्कादायक?
बाल्य विकास नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन माता आणि अर्भकांचा समावेश होता. यावेळी बाळांनी लहान ऑडिओ रेकॉर्डर घातले होते, तर त्यांच्या मातांच्या फोन वापरावर स्मार्टफोन लॉगद्वारे निरीक्षण केले जात होते. टीमने १६,००० मिनिटांच्या संकलित केलेल्या डेटाचे विश्लेषण केले आणि आढळले की जर आई एक मिनिट फोनवर व्यस्त असेल तर ती मुलाशी १६ टक्के कमी शब्द बोलू शकते. हा कालावधी जसजसा वाढत जातो तसतसा आई-मुलाचा संवाद आणखी कमी होतो. या विश्लेषणाची सरासरी पाहिल्यास, आई आणि नवजात बालकांमधील संभाषणात २६ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.