नेपाळमध्ये पुन्हा कम्युनिस्ट पंतप्रधान
By admin | Published: October 11, 2015 11:26 PM2015-10-11T23:26:30+5:302015-10-11T23:26:30+5:30
नव्या घटनेवर एकमत न झाल्यामुळे संसद सदस्यांच्या घेतलेल्या मतदानात नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव झाला आहे.
काठमांडू : नव्या घटनेवर एकमत न झाल्यामुळे संसद सदस्यांच्या घेतलेल्या मतदानात नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव झाला आहे. नेपाळमधील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते के. पी. शर्मा ओली यांनी कोईराला यांचा पराभव केला आहे.
संसदेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सीपीएन यूएमएल या पक्षाचे ते अध्यक्ष असून, त्यांना ३३८ सदस्यांचे पाठबळ मिळविण्यात यश आले. पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक २९९ संख्येपेक्षा त्यांना ३९ मते अधिक मिळाली, तर मावळते पंतप्रधान सुशील कोईराला यांना केवळ २४९ मते मिळाली. या मतदानात सर्व सदस्यांना सहभाग घेण्याची नियमानुसार सक्ती करण्यात आली होती. शर्मा ओली यांना यूसीपीएन माओवादी, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी-नेपाळ, मधेशी जनाधिकार फोरम - डेमोक्रॅटिक या पक्षांची मदत मिळाली. मतदानानंतर संसदेचे सभापती सुभाषचंद्र नेबांग यांनी निकाल जाहीर केला.
नेपाळने तयार केलेल्या नव्या राज्यघटनेस मधेशी लोकांनी विरोध केला असून, भारत-नेपाळ सीमेवर अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे. भारतातून नेपाळमध्ये जाणाऱ्या धान्य, इंधनाची वाहतूक गेले अनेक दिवस खोळंबलेली आहे.
के.पी. शर्मा ओली हे नेपाळमधील एक ज्येष्ठ माओवादी नेते म्हणून ओळखले जातात. १९६६ पासून ते राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
६३ वर्षांचे ओली वर्षभरापूर्वी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यापूर्वी त्यांनी पक्षातील जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २००६ साली गिरिजाप्रसाद कोईराला यांच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री पदावर कार्यरत होते.
ओली यांना नेपाळचे माओवादी नेते पुष्पकमल दहल यांनी पाठिंबा देताना, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ओली यांची निवड होणे जवळजवळ पक्के झाले होते.