ब्रिटनमध्ये आजपासून संपूर्ण लॉकडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:04 AM2021-01-06T01:04:53+5:302021-01-06T07:38:54+5:30
Lockdown: पंतप्रधान जॉन्सन यांची घोषणा; फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहील
लंडन : कोरोनाच्या नवसंकरित विषाणूने ब्रिटनमध्ये थैमान घातले असून, रोज मोठ्या संख्येने बाधित आढळून येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली आहे. बुधवारपासून ही टाळेबंदी अमलात येणार असून, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ती सुरू असेल.
ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात कोरोनाच्या नवसंकरित विषाणूचे अस्तित्व आढळून आले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने नाताळच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी टाळेबंदी जाहीर केली होती. अनेक देशांनीही खबरदारी म्हणून ब्रिटनकडे जाणारी वा तिकडून येणारी हवाई वाहतूक स्थगित केली.
ब्रिटनमध्ये फायझर आणि ऑक्सफर्ड लसींनाही मान्यता देण्यात आली. ऑक्सफर्डच्या लसीचा डोस देण्याची मोहीमही सोमवारपासून सुरू झाली; परंतु असे असले तरी ब्रिटनमध्ये दररोज बाधितांचा आकडा वाढत आहे.
जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत २७ हजार बाधित रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे, तसेच गेल्या मंगळवारी एकाच दिवसात ८० हजार लोकांना नव्या विषाणूची बाधा झाल्याचेही निदर्शनास आले. मृत्यूदरातही वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये यासाठी अखेरीस जॉन्सन यांनी देशव्यापी टाळेबंदीची घोषणा केली. टाळेबंदी न केल्यास बाधितांच्या संख्येचे गुणोत्तर वाढत जाण्याची भीती आहे.
नव्या कोरोना विषाणूचे ५८ हजार नवे रुग्ण
नवसंकरित कोरोना विषाणूचे एका दिवसात ५८ हजार ७८४ नवे रुग्ण आढळल्याने इंग्लंडच्या चिंतेत भर पडली आहे. साथ सुरू झाल्यापासून रुग्णसंख्येत एका दिवसात झालेली ही वाढ सर्वाधिक आहे. ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून येण्याचा हा सलग सातवा दिवस आहे. या नवसंकरित कोरोचा प्रादुर्भाव वाढल्याने इंग्लंडमध्ये सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केले आहे. इंग्लंडमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या २७ लाख १३ हजार ५६३ इतकी आहे. देशातील कोरोना बळींची संख्या ७५ हजार ४३१ वर पोहोचली आहे.
नागरिकांना आधीच अनेक निर्बंधांना सामोरे जावे लागत असल्याची कल्पना आहे. नव्या कोरोनाला नियंत्रणात आणणे आत्यंतिक गरजेचे असून, नव्या लसी ते काम प्रभावीपणे करतील. ज्यांना बाधा होण्याची शक्यता आहे त्यांना लसी देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढीस लागेल. त्यामुळे पुढील महिन्यापासून कोरोनाबाधितांचा आलेख उतरणीला लागेल, अशी आशा आहे. तोपर्यंत टाळेबंदी लागू राहील. -बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान
नव्या टाळेबंदीतील नियम असे असतील...
n लोकांनी केवळ औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडावे.
n घरातील एकाच सदस्याला बाहेर जाता येईल.
n प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पूर्णपणे बंद राहतील.
n घरातूनच कामाला प्राधान्य दिले जावे.