फ्रान्समध्ये आर्थिक सुरक्षेमुळे लॉकडाऊनचे पालन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 03:51 AM2020-04-17T03:51:35+5:302020-04-17T03:51:45+5:30
पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत.
फ्रान्समध्ये नागरिकांच्या संचारावर सरसकट निर्बंध नाहीत. आवश्यक उद्योग सुरू आहेत. तेथील शासकीय कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर जाण्यास परवानगी आहे. काही उपाहारगृहेसुद्धा सुरू आहेत. केवळ पार्सल मिळते. बसून खाता येत नाही. अन्य नागरिकांनी घराबाहेर पडण्यास बंदी आहे. फ्रान्सच्या ग्रेनोबल शहरातून मिथिला उनकुले यांचे अनुभव खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी..
पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत. उच्च शिक्षणासाठी आलेले अनेक विद्यार्थी अभ्यासाबरोबरच अर्धवेळ काम करून उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि अन्य गरजू भारतीयांना आर्थिक मदत करण्यासाठी येथील भारतीय पुढाकार घेत आहेत. माझ्या दैनंदिन जीवनावर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झालेला नाही. ग्रेनोबलच्या विद्यापीठात पर्यावरणशास्त्र या विषयात मी पीएचडी करीत असून, कॉम्प्युटर डाटाचे विश्लेषण करते. त्यामुळे घरूनच काम करीत आहे, असे मिथिला सांगतात.
असा आहे दंड
एक तास घराबाहेर पडण्याची मुभा आहे. चालणे, धावणे, पाळीव प्राण्याला फिरण्यास नेणे, यासाठी नागरिक
घरापासून एक किलोमीटर परिसरात
बाहेर पडू शकतात. मात्र, एक प्रतिज्ञापत्र सोबत बाळगावे लागते. ज्यात आपला
पत्ता, बाहेर निघण्याची वेळ, तारीख आणि कारण हे नसल्यास आणि पहिल्यांदा पकडले गेल्यास १३५ युरो (साधारण
११ हजार रुपये) दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा ४५० युरो (साधारण ३६ हजार रुपये), तर एका महिन्यात तिसºयांदा पकडले गेल्यास ३७५० युरो (३ लाख रुपये)
आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास, असा जबर दंड आहे.
...म्हणून नागरिक घरात थांबतात
सरकारकडून नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यात आली आहे. किरकोळ विक्री क्षेत्रात नोकरी गमावलेल्यांना त्यांच्या पगाराच्या ८४ टक्के रक्कम सरकार देते. छोट्या उद्योगांना मासिक भाडे, वीज व पाणीदेयक, तसेच ठरावीक कर माफ करण्यात आले आहेत.
देशवासीयांनो, बेफिकीर राहू नका
फ्रान्स, इटली, स्पेनमध्ये निर्बंध असूनही कोरोना व्हायरसची बाधा वाढतेच आहे. १२ एप्रिलपर्यंत फ्रान्समध्ये एक लाखाहून अधिक बाधित झाले, तर १४ हजार जणांचा बळी गेला. इतर देशांच्या तुलनेत भारताने प्रारंभिक टप्प्यातच लॉकडाऊन केल्याने अनेक दुष्परिणाम टळण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनचे पालन करा. घाबरायचे कारण नसले, तरी बेफिकीर राहूनही चालणार नाही, असे मिथिला यांनी नमूद केले.