अमेरिकेतील कोरोनाची स्थिती गंभीर; नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प प्रशासनाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:40 AM2020-11-15T05:40:48+5:302020-11-15T05:45:01+5:30
CoronaVirus News: अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना महामारीची स्थिती गंभीर झाली असून, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने याबाबत तात्काळ कारवाई करावी,
अशी मागणी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.
बायडेन यांना कोरोनासंबंधी वाढत्या प्रकोपाबाबत कोविड-१९ सल्लागार बोर्डाचे सहअध्यक्ष डॉ. विवेक मूर्ती, डॉ. डेविड केसलर व डॉ. मार्सेला नुनेज-स्मिथ यांनी माहिती दिली. बायडेन म्हणाले की, त्यांनी जे सांगितले ते भीषण आहे. आपल्या देशात संक्रमित रुग्ण वेगाने वाढत आहेत. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या महामारीने अनेक मृत्यू होत आहेत. संपूर्ण देशात स्थिती भीषण झाली आहे.
या आठवड्यात एक सुरक्षित व प्रभावी कोरोना लस बनविण्याच्या दिशेने एक चांगली खबर आली आहे. बायडेन म्हणाले की, मी राष्ट्राध्यक्षपदासाठी निर्वाचित झालो असून, पुढील वर्षी राष्ट्रध्यक्ष बनणार आहे. तोपर्यंत महामारी थांबणार नाही. यात सारखी वाढच होत राहणार आहे. स्थितीचे गांभीर्य ओळखून सध्याच्या प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
ट्रम्प प्रशासनाचा देशव्यापी लॉकडाऊनला नकार
n अमेरिकेत वाढत्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे जीवन, तसेच अर्थव्यवस्थाही प्रभावित होते, असे ते म्हणाले.
n व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अमेरिकेवर याचा सर्वांत मोठा आर्थिक दबाव पडला आहे. कोणत्याही प्रमुख पश्चिमी देशांच्या तुलनेत सर्वाधिक सुधारणा केल्या आहेत.
n अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसचे एक कोटीपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत, तसेच २,४४,३०२ जणांचा मृत्यू झाला आहे.
n ट्रम्प म्हणाले की, स्वस्थ झालेले अमेरिकी कामावर तसेच विद्यार्थी शाळांमध्ये जाऊ लागले आहेत. आम्ही कमजोर लोकांच्या सुरक्षेत कोणतीही कमी पडू देत नाही. एका अनुमानानुसार, राष्ट्रीय लॉकडाऊनमुळे एका दिवसात ५० अब्ज डॉलसर्सचे नुकसान होते व हजारो रोजगार समाप्त होतात. त्यामुळे आम्ही लॉकडाऊन करणार नाही. भविष्यात जे काही होईल ते चांगले होईल, अशी आशा आहे.