कबुली : पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचेच कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 06:37 AM2020-10-30T06:37:17+5:302020-10-30T06:38:28+5:30
pulwama attack News : २० महिन्यांनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने थेट संसदेतच दिली माहिती
इस्लामाबाद :भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचेच कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीच खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसून भारतीय जवानांना मारल्याचा दावाही त्यांनी केला. पाकमधील विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री फवाद चौधरी म्हणाले, आम्ही भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारलं आहे आणि पुलवामात जे यश मिळालं ते इम्रान खान सरकारचंच मोठं यश आहे. रात्री उशिरा चौधरी यांनी आपण असे म्हणालोच नसल्याचे सांगत यू टर्न घेतला.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.
मोदी-मोदीच्या घोषणांनी दणाणली पाकची संसद
बलुचिस्तानच्या खासदारांनी पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या. ज्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला पाहण्यास मिळाला. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासंबंधीची त्यांची भूमिका मांडत होते. त्या वेळी बलुचिस्तानच्या
खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादी या घोषणा दिल्या. इम्रान खान सरकारवर असलेला राग यातून दिसून आला.
पाकिस्तानचे मंत्री दहशतवादाचे समर्थक असल्याचे झाले उघड
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे वक्तव्य करत इम्रान यांच्या अडचणींत भर घातली आहे. पाकिस्तानचे मंत्री उघडउघड दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची टिप्पणी भारताने केली आहे. काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जमिनी घेण्याच्या केंद्राच्या नियमावर पाकिस्तानने केलेली टीका भारताने फेटाळून लावली आहे.