...तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 09:39 PM2017-05-08T21:39:48+5:302017-05-08T21:50:29+5:30
सुन्नी दहशतवाद्यांना लगाम न घातल्यास इराण पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल, असा धमकीवजा इशाराच इराणनं पाकिस्तानला दिला
ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. 8 - इराणनं पाकिस्तानला दहशतवादावर अंकुश ठेवण्याची सूचना केली आहे. पाकिस्ताननं सुन्नी दहशतवाद्यांना लगाम न घातल्यास इराण पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल, असा धमकीवजा इशाराच इराणनं पाकिस्तानला दिला आहे.
सुन्नी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर इराणी सुरक्षा बल असल्याचा आरोप इराणनं केला आहे. सरकारी न्यूज एजन्सी IRNA यांच्या मते, आम्ही नेहमीच ही स्थिती सहन करणार नसल्याचा इशारा सेना प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बाकरी यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 10 इराणी सुरक्षा जवान पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या हातून मारले गेले होते. पाकिस्तानमधल्या जैश अल अदल नावाच्या सुन्नी दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या आतून लांबपर्यंत मारा करणा-या बंदुकांनी इराणी जवानांना लक्ष्य केल्याचा आरोप इराणनं केला आहे. मोहम्मद बाकरी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की पाकिस्तानी अधिकारी सीमा रेषेवर स्वतःचं नियंत्रण ठेवतील.
तसेच दहशतवाद्यांना अटक करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करतील. मात्र जर दहशतवादी हल्ला असाच सुरू राहिला, तर दहशतवाद्यांचे अड्डे कुठेही असले तरी ते नेस्तनाबूत करू. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जारेफ यांनी गेल्याच आठवड्यात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे सीमेवर गस्त वाढवण्याचा आग्रह धरला होता. पाकिस्ताननं इराणला विश्वास दिला आहे की, तो नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करेल.