लंडनमध्ये जग्गनाथ मंदिराची उभारणी; भारतीय व्यावसायिकाने दिली 250 कोटींची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 05:35 PM2023-04-26T17:35:17+5:302023-04-26T17:35:50+5:30
ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर लंडनमध्येही बांधण्यात येणार आहे.
ओडिशा राज्यातील पुरीमध्ये असलेले जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर सर्वांनाच माहित आहे. आता लंडनमध्येही जगन्नात मंदिर बांधण्यात येणार आहे. हे ब्रिटनमधील पहिले जगन्नाथ मंदिर असेल. ओडिया वंशाच्या एका व्यावसायिकाने या मंदिरासाठी तब्बल 250 कोटींची देणगी देऊ केली आहे. लंडनची श्री जगन्नाथ सोसायटी ही संस्था या मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही संस्था इंग्लंडमध्ये नोंदणीकृत आहे. या संस्थेने सांगितले की, भारतीय गुंतवणूकदार विश्वनाथ पटनायक यांनी रविवारी लंडनमध्ये झालेल्या पहिल्या श्री जगन्नाथ संमेलनात मंदिराच्या बांधकामाची घोषणा केली.
या प्रकल्पासाठी देणगी देणारे विश्वनाथ पटनायक हे फिनेस्ट ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन कार हे देखील या प्रकल्पासाठी देणगी देत आहेत. अर्जुन कार यांनी घोषणा केली की, विश्वनाथ पटनायक यांनी लंडनमध्ये भगवान जगन्नाथाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी 250 कोटींची रक्कम देण्याचे वचन दिले आहे.
नवीन मंदिरासाठी अंदाजे 15 एकर जमीन खरेदी करण्यासाठी समूहाने £7 दशलक्ष देणार आहे. फिनेस्ट ग्रुप ही फर्स्ट जनरेशन खाजगी इक्विटी गुंतवणूक फर्म आहे, जी जागतिक स्तरावर अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने (EVs), हायड्रोजन लोकोमोटिव्ह, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि फिनटेकमध्ये गुंतवणूक करते.
मंदिरासाठी आर्थिक मदतीची घोषणा करताना विश्वनाथ पटनायक म्हणाले की, भगवान जगन्नाथ यांच्यावर श्रद्धा ठेवून मंदिर उभारणीसाठी काम केले पाहिजे. दरम्यान, विश्वनाथ पटनायक एक यशस्वी उद्योगपती आहेत. त्यांनी उत्कल विद्यापीठातून एमबीए आणि कायद्याची पदवी घेतली आहे. पटनायक यांनी 2009 मध्ये व्यवसाय जगतात प्रवेश केला. विश्वनाथ पटनायक धार्मिक कार्यात सक्रिय आहेत आणि ते भारताव्यतिरिक्त युनेस्कोला देणगी देतात.