आश्चर्य : 'या' देशात बार, शाळा अन् सगळंच सुरू, तरीही कोरोनावर मिळवले नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:57 AM2020-04-20T11:57:23+5:302020-04-20T12:08:20+5:30
आंद्रेस टेगनेल यांनी स्वीडन सरकारला लॉकडाऊन ऐवजी केवळ सोशल डिस्टंसिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आता येथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहे. यावरून स्वीडनने उचललेले हे पाऊन यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
स्टॉकहोम : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. परिणामी अनेक देशांतील उद्योग-धंदे ठप्प झाले आणि जनता घरातच कैद झाली. स्वीडनने मात्र, हा पर्याय नाकारला होता. यानंतर जागतीक आरोग्य संघटना आणि अनेक देशांनी स्वीडनवर टीकाही केली होती. स्वीडन सरकारने देशातील जनतेला केवळ सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह केला होता. आता स्वीडनमधील टॉप एपिडेमियोलॉजिस्टनी, सरकारचा हा निर्णय यशस्वी ठरला असून कोरोना संक्रमण पूर्णपणे नियंत्रित असल्याचा दावा केला आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, आंद्रेस टेगनेल यांनी स्वीडन सरकारला लॉकडाऊन ऐवजी केवळ सोशल डिस्टंसिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आता येथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहे. यावरून स्वीडनने उचललेले हे पाऊन यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
स्वीडनमध्ये शाळा, जीम बार सुरूच -
संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाही स्वीडनने शाळा, जीम, कॅफे, बार्स आणि रेस्टोरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. या उलट, सरकार आपल्या नागरिकांना वारंवार सोशल डिस्टंसिंगचे काटेकरपणे पालन करण्याचे आवाहन करत होते. यामुळे स्वीडनने केवळ कोरोनावरच नियंत्रण मिळवले नाही, तर लॉकडाऊनमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासूनही स्वतःचा बचाव केला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वोत्तम हेल्थ केयर सिस्टिम स्वीडनकडेच आहे. त्यामुळे, असा धोका पत्करण्यासाठी त्यांना इतर देशांप्रमाणे विचार करावा लागला नाही.
स्वीडनमध्ये 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू -
स्वीडनमध्ये आतापर्यंत 14000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1540 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी येथे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. टेगनेल यांनी म्हटले आहे, की स्वीडनमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होणे सुरू झाले आहे. आता जो ट्रेंड सामोर येत आहे, त्यानुसार या स्थिरतेचे रुपांतर हळू-हळू रुग्ण संख्या कमी होण्यात होईल.
स्वीडन पब्लिक हेल्थ अथोरिटीच्या डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजीचे प्रमुख केरिन टेगमार्क व्हिसेल यांच्या मतेही, आता कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. हा अत्यंत चांगला संकेत आहे. आता आयसीयूमध्येही रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.