चीनमध्ये १८ लाख कामगारांवर संक्रांत
By admin | Published: March 2, 2016 03:42 AM2016-03-02T03:42:59+5:302016-03-02T03:42:59+5:30
कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीन सरकारने आखली आहे. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेची
बीजिंग : कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीन सरकारने आखली आहे. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय अध्यक्ष शी जिनसिंग यांनी घेतला आहे. याचाच भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे.
चीनचे मनुष्यबळ आणि सामाजिक सुरक्षामंत्री सिन येमिन यांनी ही घोषणा केली. मात्र ही कर्मचारी कपात केव्हा करणार हे त्यांनी जाहीर केले नाही. अलीकडील काही दशकांत चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून निर्यातीवर आधारित उद्योग उभारणीस प्राधान्य दिले होते. या उद्योगात सरकारनेच मोठी गुंतवणूक केली होती. या उद्योगातच कमी कुशल असलेल्या कामगारांना मोठा वाव मिळाला होता. त्यातून चीनच्या शहरांमधील अशा कामगारांची संख्या वेगाने वाढली; पण सरकारने क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली. त्यामुळे संबंधित उद्योगातही क्षमतेपेक्षा जास्त कामगार भरती झाली. परिणामत: या उद्योगांना आपल्या वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी कराव्या लागल्या व उत्पादनाचा कमी दर याचा अर्थ तोटा. एक प्रकारे सरकारच्या सबसिडीची ही हानीच होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनने आपल्या धोरणात बदल केला असून, निर्यातीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यापेक्षा देशांतर्गत खप वाढविण्याच्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. आता जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना चीनला हे धोरण स्वीकारण्याशिवाय
पर्याय उरला नाही. संपूर्ण जगात चीनची निर्यात सर्वाधिक होती. या निर्यातीच्या आधारेच चीनने गेल्या काही
दशकांत सर्वाधिक वेगाने वृद्धी केली
होती. (वृत्तसंस्था)मंदीमुळे निर्यातीवर आधारित आर्थिक धोरणे अवलंबणे चीनच्या अंगलट आले आहे. ब्राझील आणि आॅस्ट्रेलिया हे देश प्रामुख्याने चीनला कच्च्या मालाचा पुरवठा करीत होते. त्यात लोखंड आणि कोळशाचे जास्त प्रमाण होते. मात्र मंदीमुळे या देशांनीही मालाचा पुरवठा कमी केला. परिणामत: चीनमधील उत्पादन घटले. स्वत: ब्राझीलमध्येच तीव्र मंदी आली आहे. त्या देशाची निर्यात घसरल्याने जास्त फटका बसला आहे.दुसरीकडे चीनमधील मंदीमुळे पोलाद उद्योगात आलेली मंदी अमेरिकेतील पोलाद उद्योगासाठी फायदेशीर ठरणार आहे.
2015
च्या चौथ्या तिमाहीत अमेरिकेतील पोलाद उद्योगाला १.४ अब्ज डॉलरचा तोटा झाला
आहे, असे अमेरिकी वाणिज्य विभागातर्फे सांगण्यात आले. चीनमधून पोलादाची स्वस्त निर्यात होत असल्याने आपल्याला चौथ्या तिमाहीत तोटा झाल्याचे अमेरिकेबाहेरील प्रथम क्रमांकाच्या
आर्सेलर मित्तल या पोलाद कंपनीने म्हटले आहे.