दुबईत झाली COP 28 परिषद, ठरल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; पण अजरबैजानबाबत आधीच वाद का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:29 PM2023-12-14T17:29:53+5:302023-12-14T17:33:47+5:30

पंतप्रधान मोदी देखील या परिषदेत झाले होते सहभागी

Cop 28 Conference of the parties Dubai key highlights un climate summit Azerbaijan controversy | दुबईत झाली COP 28 परिषद, ठरल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; पण अजरबैजानबाबत आधीच वाद का?

दुबईत झाली COP 28 परिषद, ठरल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; पण अजरबैजानबाबत आधीच वाद का?

COP म्हणजेच विविध पक्षांची परिषद (Conference of the parties) ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद आहे. ही परिषद संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेली आहे. COP 28 ही परिषदेची २८वी आवृत्ती आहे. २८ नोव्हेंबरला सुरू झालेली पक्षांची परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार होती, पण बुधवारी १३ डिसेंबरला संपली. सुमारे दोन आठवडे चाललेली ही परिषद दुबईतील एक्स्पो सिटी येथे पार पडली. UAE हे या परिषदेचे यजमान होते, पण त्याच गोष्टीला प्रचंड विरोध झाला. यामागचे नक्की कारण काय, जाणून घेऊया.

दुबईमध्ये सुमारे 140 देशांचे राष्ट्रप्रमुख, 70 हजारांहून अधिक सदस्य आणि हवामान विषयावरील तज्ज्ञ एकत्र आले होते. भारताच्या वतीने COP 28 मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी दुबईला पोहोचले आणि या शिखर परिषदेत सहभागी झाले. शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी अशी घोषणा झाली ज्याची जगाला पहिल्या दिवसापासून अपेक्षा होती. परिषदेच्या शेवटच्या दिवशी कोळसा, तेल आणि वायूचा वापर बंद करण्याबाबत एकमत झाले. काही टीकांव्यतिरिक्त, याला ऐतिहासिक करार म्हटले गेले.

सामंजस्य करारातील ३ महत्त्वाच्या बाबी:

  • पहिली बाब- तीन दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदायाने हवामान करारांमध्ये जीवाश्म इंधनाचा थेट उल्लेख टाळला. याचे कारण जगातील तेल आणि वायूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे देश होते. या मुद्यावर काही देश प्रत्येक वेळी अडथळे आणत असत पण यावेळी ही स्थिती वेगळी दिसली. हळूहळू जीवाश्म इंधने टप्याटप्याने काढून टाकली जातील असे ठरले.
  • दुसरी बाब- 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 43 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2035 पर्यंत त्यात 60 टक्के कपात करण्याचे मान्य करण्यात आले आहे. एकीकडे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा करार झाला आहे, तर दुसरीकडे अक्षय्य ऊर्जा तिप्पट करण्याचा करार झाला.
  • तिसरी बाब- ज्या देशांना हवामान बदलाचा फटका बसला आहे आणि विकसित होत आहेत, आणि या आपत्तीशी लढण्यासाठी इतका पैसा नाही अशा देशांसाठीही तोटा आणि नुकसान निधी तयार करण्यात आला आहे. अनेक देशांनी यामध्ये सहभागाबद्दल बोलले आहे. अंदाजे 700 दशलक्ष डॉलर्सचे सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.


अझरबैजान वरून वाद का?

COP 29 पुढील वर्षी अझरबैजानमध्ये होणार असून ही जगातील सर्वात मोठी हवामान शिखर परिषद असणार आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अझरबैजानला हे आयोजन करण्यापूर्वीच जगभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांनी अझरबैजानवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशात हवामान बदलाच्या उपायांबद्दल बोलणे आणि अजरबैजानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचाही आरोप या दोन गोष्टी इतर सदस्यांना खटकणाऱ्या आहेत. त्यामुळे यावरून वाद सुरू झाला आहे.

COP म्हणजे काय, कधी सुरू झाले, उद्देश काय?

COP ची स्थापना 1992 साली झाली. हा हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनचा किंवा UNFCCC चा एक भाग आहे. ते हवामान बदलाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करते आणि निर्णय घेते. संयुक्त राष्ट्रांच्या या आराखड्यावर जगातील सुमारे १९७ देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. स्वाक्षरी करणाऱ्या प्रतिनिधींना पक्ष म्हणतात. सर्व प्रतिनिधी एका परिषदेसाठी एकत्र येत असल्याने त्याला कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात. ही त्याची 28 वी आवृत्ती होती, म्हणून त्याला कॉप 28 म्हटले गेले.

Web Title: Cop 28 Conference of the parties Dubai key highlights un climate summit Azerbaijan controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.