कोपा अमेरिका फुटबॉल : अर्जेंटिनाला फायनलमध्ये ‘तिखट’ आव्हान
By admin | Published: June 23, 2016 06:34 PM2016-06-23T18:34:06+5:302016-06-23T18:37:31+5:30
गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमी फायनलमध्ये कोलंबियाला २-0 ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
ऑनलाइन लोकमत
शिकागो, दि. 23 - गत चॅम्पियन चिलीने पूर्वार्धात केलेल्या दोन जबरदस्त गोलच्या जोरावर पावसामुळे बाधित झालेल्या सेमी फायनलमध्ये कोलंबियाला २-0 ने हरवून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांना सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यास उत्सुक असलेल्या अर्जेंटिनाशी भिडावे लागणार आहे. रविवारी न्यू जर्सी येथील ईस्ट रुदरफोर्ड मैदानावर या दोन बलाढ्य संघामध्ये अमेरिका खंडाचा बादशाह बनण्यासाठी झुंज रंगणार आहे.
तत्पूर्वी, अर्जेंटिनाने यजमान अमेरिकेला ४-0 ने एकतर्फी हरवून अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा चिली आणि अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेच्या किताबासाठी अंतिम फेरीत झुंजणार आहेत. गेल्यावेळी चिलीने अर्जेंटिनाला ४-१ असे हरवून अजिंक्यपद मिळवले होते.
एरानगुएजचा पहिला धमाका
चिलीचा मिडफिल्डर चार्ल्स एरानगुएजने सातव्या मिनिटाला पहिला गोल ठोकून १-0 अशी आघाडी मिळवून दिली. कोलंबियाच्या मिडफिल्डर कुआड्राडो याचा भरकटलेला हेडर थेट एरानगुएज याच्याजवळ पोहचला. त्याने या संधीचा फायदा उठवत कोलंबियाचा उपकर्णधार आणि गोलकिपर डेव्हिड ओसपिना याला चकवून गोल डागला. यानंतर अकराव्या मिनिटाला जोस पेड्रो फ्यूनजालिदाने दुसरा गोल नोंदवून आघाडी २-0 अशी केली. गोलपोस्टला धडकून परत आलेल्या चेंडूला पेड्रोने चपळाईने पुन्हा गोलपोस्टमध्ये धाडले. यामुळे कोलंबिया प्रचंड दबावात आला. त्यानंतर उत्तरार्धात पावसामुळे खेळ दोन तासासाठी थांबविण्यात आला.
पाउस ओसरल्यानंतर दोन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले. परंतु 0-२ ने पिछाडीवर पडलेल्या कोलंबियन संघाला फारशी करामत दाखवता आली नाही. ५६ व्या मिनिटाला कोलंबिया संघाला गोल करण्याची संधी होती, परंतु त्यांना ती साधता आली नाही.
मिडफिल्डर आर्टुरो विडाल आणि मार्सेलो डियाज या दोन खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या चिलीला अर्ध्या तासानंतर पेड्रो हर्नांडिस जखमी झाल्याने आणखी एका खेळाडूला मुकावे लागले. कोलंबियाकडून जेम्स रॉड्रिग्जच्या दोन चांगल्या प्रयत्नांना गोलमध्ये रुपांतरीत करताना न आल्याने त्यांचा गोलफलक कोराच राहिला.
कोलंबियाला आता तिसऱ्या स्थानासाठी प्लेआॅफ लढतीत अमेरिकेशी शनिवारी लढावे लागेल.
---------------------------------
आम्ही चांगला खेळ केला परंतु चिलीचा संघ वरचढ ठरला. आम्ही सामन्यात पुनरागमन करु अशी आम्हाला अपेक्षा होती, पण परिस्थिती आमच्या विरुध्द होती.
-जुआन कुआड्राडो, मिडफिल्डर, कोलंबिया