वास्तव हेच, कोरोना : १,६६५ बळी, तर ६८,५०० लोकांना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:34 AM2020-02-17T06:34:32+5:302020-02-17T06:34:50+5:30
या विषाणूने ग्रस्त झालेले २००९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत.
बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संसर्गाने बळी पडलेल्यांची संख्या १६६५वर पोहोचली असून या विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या ६८,५०० झाली आहे. त्या देशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
या विषाणूने ग्रस्त झालेले २००९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. चीनमध्ये शनिवारी १४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहान येथील १३९ लोकांचा समावेश आहे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला यश येईल असा दावा चीनने केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी उपचारानंतर बरे झालेल्या ९४१९ जणांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्या देशातील १७०० डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही साथ चीनमधून अन्य देशांतही पसरली आहे. तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पाठविलेल्या वैद्यकीय पथकातील तज्ज्ञ चीनच्या डॉक्टरांना मदत करत आहेत.
‘ते’ ४०६ भारतीय कोरोनाग्रस्त नाहीत
चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधून भारतात परत आणलेल्या ४०६ भारतीय नागरिकांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या सर्वांना सोमवारपासून टप्प्याटप्प्याने घरी पाठविले जाणार आहे. चीनमधून विशेष विमानाने या सर्वांना दिल्लीला आणून आयटीबीपीच्या अख्यत्यारीतील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
१७५ नेपाळी नागरिक मायदेशी
कोरोनाची साथ जिथून साºया जगभर पसरली त्या चीनच्या हुबेई प्रांतात अडकून पडलेल्या १७५ नेपाळी नागरिकांना वुहान येथून विशेष विमानाने रविवारी काठमांडूला आणण्यात आले.
त्यामध्ये १७० नेपाळी विद्यार्थी, १ कर्मचारी, दोन पर्यटक, दोन लहान मुलांचा समावेश आहे. वुहानमधील नेपाळी नागरिकांपैकी १८५ जणांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यातील चार जणांनी नंंतर चीनमध्येच राहाण्याचा निर्णय घेतला. आणखी सहा जणांना वैद्यकीय कारणांमुळे नेपाळला परतणे शक्य झाले नाही. नेपाळमध्ये परत आणलेल्या १७५ जणांना भक्तपूर जिल्ह्यातील खारीपाटी येथे नेपाळ इलेक्ट्रिसिटी आॅथॉरिटी ट्रेनिंग सेंटर येथे त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
क्रूझवरील आणखी दोन भारतीय करोनाग्रस्त
च्जपानमध्ये योकोहामा बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझवरील भारतीयांपैकी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे तेथील भारतीय रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. याआधी तिथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन भारतीयांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या क्रूझवरील प्रवासी, कर्मचाºयांपैकी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रविवारी ३५५ झाली आहे. तिथे ३७०० जण आहेत. त्यात शनिवारी ७० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. क्रूझवर १३८ भारतीय असून त्यामध्ये १३२ कर्मचारी व ६ प्रवासी आहेत.
या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे जपानमधील भारतीय राजदूतावासाने म्हटले आहे.