CoronaVirus: 'कोरोना'लाही कोरोनाचा फटका; उत्पादन थांबवण्याचा कंपनीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:12 PM2020-04-03T17:12:59+5:302020-04-03T17:13:16+5:30
Coronavirus देशात आरोग्य आणीबाणी लागू झाल्यानं कंपनीचा निर्णय
मेक्सिको सिटी: कोरोनाचा धोका वाढल्यामुळे मेक्सिकोमध्ये आरोग्य आणीबाणी लागू झाली आहे. त्यामुळे ग्रुपॉ मॉडलू कंपनीनं कोरोनासह पॅसिफिको आणि मॉडलू या ब्रँड्सचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेक्सिको सरकारनं केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोरोना बिअरचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय ग्रुपॉ मॉडलू कंपनीनं घेतला आहे. ३० एप्रिलपर्यंत कोरोनाचं उत्पादन बंद ठेवण्यात येणार आहे.
आम्ही उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत, अशी माहिती कंपनीनं प्रसिद्धीपत्रातून दिली आहे. येत्या काही दिवसांत उत्पादन हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल, असंदेखील कंपनीनं स्पष्ट केलं आहे. पुढील काही दिवस केवळ शेती आणि वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचे आदेश मेक्सिको सरकारनं दिले आहेत. सरकारनं परवानगी दिल्यास ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या मदतीनं उत्पादन सुरू ठेवू, असं ग्रुपॉ मॉडलूनं म्हटलं आहे.
बिअर निर्मिती क्षेत्रातील मेक्सिकोमधील आणखी एक मोठी कंपनी असलेल्या हाईनकननंही तकेट आणि डॉस इक्वस ब्रँड्सचं उत्पादन बंद करण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप तरी कंपनीनं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हाईनकनचं उत्पादन मेक्सिकोच्या उत्तरेकडील राज्यात होतं. या राज्यातल्या सरकारनंही बिअरचं उत्पादन आणि वितरण थांबवणार असल्याची घोषणा केली. यानंतर ग्राहकांची तारांबळ उडाली आणि बिअर खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली.
चीनमधून कोरोना जगभरात पसरल्यानंतर कोरोना बिअर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. तिच्यावर विनोद आणि मीम्सदेखील तयार झाले. सोशल मीडियात हे मीम्स व्हायरलदेखील झाले होते. यानंतर अमेरिकेतील कोरोना बिअरची विक्री ४० टक्क्यांनी कमी झाली.