CoronaVirus : रशियात कोरोनाचं थैमान; एकाच दिवसात 1189 जणांचा मृत्यू; चीन, युरोपात धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 08:32 PM2021-11-03T20:32:32+5:302021-11-03T20:33:25+5:30
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनुसार युरोपात नवी रुग्ण संख्या सहा टक्के अथवा 30 लाखांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती.
वॉशिंग्टन - जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. रशियातील संक्रमितांची आकडेवारी दररोज नवनवे विक्रम करत आहे. ब्रिटन आणि चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची संख्या 24.74 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही 50.1 लाखांच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 46,140,509 कोरोना रुग्ण आढळून आले असून 748,173 जणांचा मृत्यू झाला आहे.
रशियाला बसतोय तगडा तडाखा -
कोरोनाने रशियाला जोरदार तडाखा दिला आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांत 40,443 नवे कोरोनाबाधित समोर आले. यासह एकूण संक्रमितांची संख्या 8,633,643 वर पोहोचली आहे. एवढेच नाही तर रशियामध्ये एका दिवसात 1,189 जणांचा मृत्यू झाला असून, यासह मृतांची संख्या 242,060 वर गेली आहे.
युरोपात सातत्याने वाढतायत रुग्ण -
युरोपात सलग पाटव्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनुसार युरोपात नवी रुग्ण संख्या सहा टक्के अथवा 30 लाखांनी वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली होती. इंग्लंडमधील उच्च स्थरीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सरकाराला पुन्हा एकदा मास्कचा वापर आणि डिस्टंसिंगचे नियम लागू करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
चीनमध्ये 100 नवे रुग्ण -
चीनमध्ये बुधवारी 100 हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यांपैकी नऊ रुग्ण बीजिंगमध्ये आढळून आले आहेत. बीजिंगमध्ये यापूर्वीच अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. शहरातून देशाच्या इतर भागांत जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या नेशनल हेल्थ कमीशनच्या अहवालात म्हणण्या आले आहे की, मंगळवारपर्यंत 1,000 रूग्णांवर उपचार सुरू होते. यांपैकी 37 जणांची प्रकृती चिंताजनक होती. चीनच्या 76 टक्के जनतेला कोरोना लस दिली असतानाही, तेथे अशी परिस्थिती आहे.