कोरोनास्त्र! चीनने भारतासह G7 देशांना झोपविले; GDP त स्वत: मात्र प्लसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 09:25 PM2020-08-31T21:25:01+5:302020-08-31T21:28:07+5:30
कोरोनामुळे बहुतांश देशांमध्ये एप्रिलपासून लॉकाडाऊन जाहीर करण्यात आले होते. तर त्याचवेळी चीनने कोरोनावर मात केली होती.
आज भारताचा जीडीपी आकडा जाहीर झाला. कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून जीडीपी थेट उणे 23.9 टक्क्यांवर गेला आहे. असाच परिणाम जी 7 राष्ट्रांच्या जीडीपीवर झाला असून कोरोना व्हायरसचा जन्मदाता चीन मात्र याला अपवाद ठरला आहे. धक्कादायक म्हणजे सात देशांमध्ये एकटा चीनच प्लसमध्ये असून बाकी सारे देश मायनसमध्ये आहेत.
जुलै महिन्य़ामध्ये आठ इंडस्ट्रीच्या उत्पादनांमध्ये 9.6 टक्के घट झाली आहे. मंत्रालयाच्या आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत स्थिर किंमतीवर म्हणजेच रियल जीडीप 26.90 लाख कोटी रुपये राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही जीडीपी 35.35 लाख कोटी रुपये होती. अशाप्रकारे यामध्ये 23.9 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी जीडीपीमध्ये 5.2 टक्क्यांची वाढ झाली होती.
जी 7 देशांची आकडेवारी पाहता त्या तुलनेत भारताला सर्वात मोठा फटका बसला आहे. यानंतर इंग्लंडचा नंबर लागत आहे. इंग्लंडचा जीडीपी - 20.4 टक्क्यांवर घसरला आहे. फ्रान्सचा उणे 13.8, इटलीचा उणे 12.4, कॅनडाचा -12, जर्मनीचा -10.1, अमेरिकेचा -9.5, जपानचा -7.6 टक्क्यांनी घसरला आहे. तर एकट्या चीनचा जीडीपी हा 3.2 टक्क्यांवर आहे.
का झाला परिणाम?
कोरोनामुळे बहुतांश देशांमध्ये एप्रिलपासून लॉकाडाऊन जाहीर करण्यात आले होते. तर त्याचवेळी चीनने कोरोनावर मात केली होती. यामुळे तिथे वुहान सोडता अन्य शहरे बऱ्यापैकी सुरु होती. केवळ मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आदी बंधने होती. मात्र, उर्वरित जगभरात कोरोनामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे तेथील मेडिकल, किराणा आदी व्यवहार सोडता इतर व्यवहार बंद होते. याचा गंभीर परिणाम या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. भारत, अमरेकेने दिलासा देणारे पॅकेज जाहीर केलेले असले तरीही त्याच्या परिणाम जाणवलेला नाही. भारतात जूनमहिन्यात कंपन्या सुरु व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, भारतातील सर्वात मोठे 8 सेक्टर आजही धडपडत आहेत. जुलै महिन्य़ामध्ये आठ इंडस्ट्रीच्या उत्पादनांमध्ये 9.6 टक्के घट झाली आहे.