धक्कादायक! दोन्ही लसी घेतल्यानंतरही अँटिबॉडीज कमी होण्याची भीती; कोविशील्डचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:57 AM2021-07-28T05:57:42+5:302021-07-28T05:58:06+5:30
विशेषत: नव्या रूपातील विषाणूशी लढताना मात्र हे किती लवकर घडेल याचे भाकीत अद्याप करता आलेले नाही, असे हा अभ्यास म्हणतो.
लंडन : फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतल्यानंतर सहा आठवड्यांनी एकूण अँटिबॉडी (प्रतिपिंड) पातळ्या कमकुवत व्हायला सुरुवात होत असल्याचे ‘द लॅन्सेट’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात आढळले आहे. ही अँटिबॉडी पातळी १० आठवड्यांनंतर किंवा २-३ महिन्यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्तही कमी होऊ शकते.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (यूसीएल) संशोधकांचे म्हणणे असे की, जर अँटिबॉडी पातळी याच वेगाने घसरत राहिली तर लसींपासून मिळणाऱ्या संरक्षणाचे परिणाम कमीही व्हायला लागतील अशी काळजी वाटते. विशेषत: नव्या रूपातील विषाणूशी लढताना मात्र हे किती लवकर घडेल याचे भाकीत अद्याप करता आलेले नाही, असे हा अभ्यास म्हणतो. याबाबत अधिक संशोधन अद्याप सुरू आहे.
अभ्यासात काय आढळले...
यूसीएलच्या व्हायरस वॉच अभ्यासाला असेही आढळले आहे की, फायझर लसीच्या दोन मात्रांनंतर (ॲस्ट्राझेनेका लसीच्या दोन मात्रांच्या तुलनेत) अँटिबॉडी पातळी ही लक्षणीयरीत्या उंचावलेली आहे.
ॲस्ट्राझेनेका लस भारतात कोविशिल्ड म्हणून ओळखली जाते. लसीकरण झालेल्यांमध्ये अँटिबॉडी पातळी ही सार्स-कोव्ह-२ ची बाधा व्हायच्या आधीच्या तुलनेत खूप जास्त होती, असे त्यात म्हटले.
ॲस्ट्राझेनेका किंवा फायझर लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर अँटिबॉडी पातळी प्रारंभी खूप जास्त होती आणि त्यामुळेच कोविड-१९ पासून संरक्षणासाठी ती महत्त्वाची बनली, असे यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्फॉर्मेटिक्सच्या मधुमिता श्रोत्री यांनी निवेदनात म्हटले.
तथापि, दोन ते तीन महिन्यांनंतर ती पातळी लक्षणीयरीत्या खाली आल्याचे आम्हाला आढळले, असेही श्रोत्री म्हणाल्या.