कोरोनामुळे जगात आतापर्यंत 40 लाख नागरिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 05:57 AM2021-06-19T05:57:49+5:302021-06-19T05:57:58+5:30
देशामध्ये उपचार घेणाऱ्यांत घट; ७३ दिवसांतील कमी प्रमाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ४० लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ कोटी ८२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. भारतामध्ये आठ लाखांहून कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ७३ दिवसांतले हे सर्वात कमी प्रमाण आहे. गेल्या चोवीस तासांत ६२ हजार नवे रुग्ण आढळले.
जगातील एकूण रुग्णांपैकी १६ कोटी २७ लाखजण बरे झाले; तर १ कोटी १६ लाख रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ८२ हजार लोकांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांमधे नवे रुग्ण व मृत्यूच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर वर्षभरातच या संसर्गाने २ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, पुढच्या १६६ दिवसांत आणखी २ लाखांचा बळी गेला. जागतिक स्तरावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ५० टक्के लोक अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया, मेक्सिको या पाच देशांतील आहेत.
भारतामध्ये गेल्या चोवीस तासांत ६२ हजार ४८० नवे रुग्ण सापडले, तर त्यापेक्षा अधिक म्हणजे ८८ हजार ९७७ जण बरे झाले व १५८७ जणांचा मृत्यू झाला. सलग ३६ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. २ कोटी ९७ लाख ६२ हजार ७९३ रुग्णांपैकी २ कोटी ८५ लाख ८० हजार ६४७ जण बरे झाले. आतापर्यंत ३ लाख ८३ हजारजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांचा आकडा ९६.०३ टक्के आहे. ७ लाख ९८ हजार ६५६ जणांवर उपचार सुरू आहेत.
पाच राज्यांतील ६९%
n देशातील कोरोना रुग्णांपैकी ६९.७ टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यांतील आहेत.
n दर आठवड्याचा व दररोजचा संसर्गदर अनुक्रमे ३.८० टक्के व ३.२४% आहे.
लसीचे दिले २६.८६ कोटी डोस
देशात आतापर्यंत कोरोना लसीचे २६.८६ कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३८ कोटी ७१ लाख ६७ हजार ६९६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.