चीनमध्ये निर्बंध शिथील करताच कोरोना वाढला, रुग्णालयांमध्ये गर्दी; ICU बेड्समध्ये वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 02:53 PM2022-12-11T14:53:36+5:302022-12-11T14:54:04+5:30
चीनमध्ये कोरोना विषाणूचे संकट पुन्हा गंभीर होऊ लागले आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूचे संकट पुन्हा गंभीर होऊ लागले आहे. कोविड-19 च्या नवीन धोरणाविरोधात चीनमध्ये निदर्शने करण्यात आली, त्यानंतर बहुतांश ठिकाणी कोविड निर्बंध उठवण्यात आले. परंतु त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. रुग्णालय आणि अतिदक्षता विभागातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर सरकारला निर्बंध लादावे लागले. चीन सरकारच्या झिरो कोविड धोरणामुळे लोकांना घरातच राहण्यास भाग पडलं आणि आर्थिक वाढ मंदावली. याचा जोरदार निषेध नागरिकांकडून सुरू झाला. सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, साथीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांमध्ये आयसीयूची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी, चीनमध्ये कोरोनाचे १०,८१५ नवीन रुग्ण नोंदवले गेले, त्यापैकी ८,४७७ रुग्ण कोणतेही लक्षण नसलेले आहेत.
अध्यक्ष शी जिनपिंग यांचे सरकार व्हायरसचे संक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्याच्या जनतेचा वाढता रोष पाहता सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष विलगीकरण किंवा प्रवास बंदी सारखे कठोर नियम आता लादू इच्छित नाही.
चीनमधील अनेक रेस्टॉरंट्स बंद केले
चीनी माध्यमांनुसार, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयांना संपूर्ण मनुष्यबळ कामाला लावण्याचं आणि सुविधा वाढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रभावीपणे सामना करता येईल आणि औषधांचा पुरवठा वाढवता येईल यासाठीही सूचना दिल्या गेल्या आहेत. अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील ६५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. बीजिंगने गेल्या आठवड्यात अनेक भागात दिवसातून एकदा चाचणी अनिवार्य केल्यानं संसर्गाची प्रकरणं किती वाढली आहेत हे स्पष्ट नाही, परंतु मुलाखती आणि सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार देशभरातील व्यवसाय आणि शाळांमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. उद्रेक दिसून आला आहे. बरेच कर्मचारी आजारी पडल्यामुळे काही रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय बंद झाले आहेत.
रुग्णांना केलं गेलं घरीच क्वारंटाइन
चीनमध्ये अधिकृत पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याची नोंद आहे, परंतु बुधवारी अनेक प्रदेशांमध्ये अनिवार्य चाचणी संपल्यानंतर लोकसंख्येचा मोठा भाग यात समाविष्य केला जात नाही असंही आढळून आलं आहे. केसेस कमी होण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे. अनेक कंपन्यांच्या बाधित कामगारांना घरीच क्वारंटाईन करण्यास भाग पाडण्यात आलं आहे, तर अनेक जण संसर्गामुळे बाहेर न जाण्याचा स्वतःचा निर्णय घेत आहेत.